'राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करावी, जयंत पाटलांना आमच्या शुभेच्छा' By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 04:37 PM 2021-06-21T16:37:24+5:30 2021-06-21T16:48:39+5:30
आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी झालेली नाही. राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे.
केवळ निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करणाऱ्याला अर्थ नाही. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीचं स्वबळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला हवं, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.
याबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता मुख्यमंत्र्यांनी भाषणातून नेमका कुणाला सल्ला याची स्पष्टता झालेली नाही, असं म्हटलं आहे.
काँग्रेससोबत भाजपनंही स्वबळाची नारा दिला आहे. याआधीही भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे यात काहीच गैर नाही, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तिघांनी एकत्र राहिले पाहिजे. परंतु कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे.
जयंत पाटील यांच्या विधानावरही नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे. जयंत पाटील यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे नानांनी म्हटलं.
कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन काम केलंय. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वाटप, प्लाझ्मा दान अशी अनेक कामं काँग्रेसनं केली आहेत.
स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?
आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय.