राज्यातील युवक काँग्रेसनेच झळकावले पंतप्रधान मोदींचे डिजिटल बॅनर By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 05:18 PM 2021-03-02T17:18:03+5:30 2021-03-02T17:31:46+5:30
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असताना केंद्र सरकार यावर मूग गिळून गप्प का बसले आहे? याबद्दल जाब विचारण्याकरिता आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जोरदार राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असताना केंद्र सरकार यावर मूग गिळून गप्प का बसले आहे? याबद्दल जाब विचारण्याकरिता आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जोरदार राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क (excise duty) कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे.
अर्थमंत्रालय त्यावर सकारात्मक विचार करत असून राज्ये, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज एजन्सी रॉयटर्सची आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानुसार ही माहिती दिली आहे. गेल्या 10 महिन्यांत कच्च्या तेलाल्या किंमतीत दुप्पट वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम देशातील इंधनवाढीवर झाल्याचे दिसून येत आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरांवर सर्वसामान्यांना जवळपास ६० टक्क्यांपर्यंत कर भरावा लागत आहे. तसेच, कोरोना संकट काळाचाही आर्थिक हालचालींवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.
देशभरातून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात येत आहे, इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य बनविण्यात येत आहे. राज्यातील युवक काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्त्वात अनोखे आंदोलन केले.
केंद्र सरकारचा मास्क तोंडासोबत डोळे आणि कानावर सुद्धा ! असे म्हणत युवक काँग्रेसने विविध ठिकाणी नरेंद्र मोदींचे बॅनर झळकावले आहेत.
काँग्रेसने झळकावलेल्या या बॅनरवर मोदींच्या डोळ्यावर, तोंडावर आणि कानावरही पट्टी बांधल्याचं चित्रात दिसत आहे.
इंधन दरवाढ मोठी झाली असून पेट्रोल 100 रुपये पार गेलंय, तरीही मोदी काहीही बोलत नाहीत, ऐकत नाहीत आणि पहातही नाहीत, असे म्हणत त्यांचे डिजिटल बॅनर झळकावले आहे.
दरम्यान, काँग्रेस मंत्र्यांनी आणि आमदारांनी सोमवारी सायकलवरुन विधानसभा गाठली, इंधन दरवाढीचा असाही निषेध नोंदवला होता.