Vinayak Mete: आठवण एका फ्रेमची! ज्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र गहिवरला, मराठवाडा रडला By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 01:04 PM 2022-08-15T13:04:24+5:30 2022-08-15T13:36:55+5:30
Vinayak Mete: कार्यकर्त्यांसोबत भावनिक आणि राजकीय नातं जोडल्यामुळे या नेतेमंडळींच्या, त्यांच्या कुटुंबातील सुख-दु:खातही कार्यकर्ता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षणे सहभागी होत असतो. राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी पोखळी निर्माण होत असते. त्यातच, आपल्या कर्तृत्वाने घडलेल्या आणि एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेल्या नेतेमंडळींची थेट कार्यकर्त्यांसोबत नाळ जोडलेली असते.
कार्यकर्त्यांसोबत भावनिक आणि राजकीय नातं जोडल्यामुळे या नेतेमंडळींच्या, त्यांच्या कुटुंबातील सुख-दु:खातही कार्यकर्ता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षणे सहभागी होत असतो.
माजी आमदार आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करणारे नेते विनायकराव मेटे यांचे अकाली निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि महाराष्ट्राने, मराठवाड्याने एक चळवळीतला कार्यकर्ता, नेता गमावला.
विनायक मेटेंच्या निधनानंतर राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह शरद पवारांनीही त्यांच्या आठवणी जागवल्या. एक लढाऊ कार्यकर्ता आणि मराठवाड्यातील चळवळीचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
विनायक मेटेंच्या निधनापूर्वी महाराष्ट्राने अशा आणखी 3 नेत्यांचं अकाली निधन पाहिलं आहे. या तिन्ही नेत्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळा होता. तर, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर मराठवाडा धाय मोकलून रडला होता. हे चारही नेते एका कार्यक्रमानिमित्त कधीकाळी एकत्र आले होते, तेव्हा ते एकाच फ्रेममध्ये टिपण्यातही आले. तो फोटो सध्या व्हायरल होत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचेही अकाली निधन झाले होते. 14 ऑगस्ट 2012 रोजी विलासराव देशमुख यांचे निधन झाले होते. त्यानंतर, 15 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर बाभूळगाव येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
लातूरमधल्या बाभळगावचे ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास करणारे विलासराव निधन झाले तेव्हा ६७ वर्षांचे होते. त्यामुळे, मुत्रपिंड निकामी झाल्यानंतर त्यांच्या अकाली एक्झिटमुळे मराठवाड्यातील जनतेला अश्रू अनावर झाले होते.
मराठवाड्यातील लोकनेते अशी ओळख असलेले गोपीनाथ मुंडें यांचेही असेच अकाली निधन झाले. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीहून बीडकडे येण्यासाठी निघालेल्या मुंडेंच्या गाडीला विमानतळाकडे जात असताना झाला होता.
भीषण अपघातात आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा ते ६५ वर्षांचे होते. एका सर्वसामान्य कुटुंबातून देशाच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत त्यांनी मजल मारली. म्हणून, मराठवाड्यातील गावागावात त्यांचे कार्यकर्ते होते, जे त्यांच्या निधनानंतर स्वत:च्या डोळ्यातील अश्रूंना थांबवू शकत नव्हते.
गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांचेही असेच अकाली निधन झाले. 16 फेब्रुवारी 2015 रोजी आर. आर. पाटील यांचे निधन झाले, तेव्हा ते 57 वर्षांचे होते. त्यांच्याही अकाली निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता.
आर. आर. पाटील यांची कॅन्सरशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राने एक तळागाळातून आलेला संवेदनशील मनाचा नेता गमावल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त झाली, तर सांगलीसह तासगावकर धाय मोकलून रडले होते.
दरम्यान, विलासराव देशमुख आणि विनायक मेटे यांच्या निधनात तारखेचे साम्य दिसून येत असल्याने हा योगायोगच म्हणावा लागेल. या दोन्ही नेत्यांचे निधन 14 ऑगस्टो रोजी झाले. तर, त्यांच्या पार्थिवावर 15 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.