'अजित पवार सटकले', संजय राऊत असं का म्हणाले By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 09:01 AM 2021-09-26T09:01:59+5:30 2021-09-26T09:14:52+5:30
पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना सुनावले. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आता महाराष्ट्राला नवा राहिला नाही. त्यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दीक कलगीतुरा नित्याचाच झाला आहे.
दुसरीकडे माजी खासदार किरीट सोमय्यांनी मंत्रिमंडळातील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करुन वातावरण दणाणून सोडलं आहे. तर, संबंधित मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ते पत्रकार परिषदाही घेत आहेत.
शिवसेना भाजपच्या या वादावरुन संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांची 'रोखठोक' खिल्ली उडवली आहे. त्यामध्ये, चंद्रकांत पाटील यांच्या अजित पवारांबद्दलच्या विधानाचाही समाचार घेतला.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून रोखठोक या सदराखाली चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या आणि भाजपची जोरदार खिल्ली उडवली आहे.
महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा, किती मनोरंजन कराल? या मथळ्याखाली राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 'महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडल्याचे त्यांनी म्हटलं.
माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात, चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हा आहे. एकंदरीत सगळीच गंमत आहे.', असे राऊत यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे.
पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना सुनावले.
पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार? 'ईडी'च्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवणच राऊत यांनी रोखठोक भूमिकेतून करुन दिली आहे. तसेच, पाटील यांची खिल्लीही उडवली आहे.