नाशिक : येथील नाशिकरोड परिसरात जन्मदात्या पित्यानेच दोन अल्पवयीन मुलींचा गळा आवळून खून केला तर एका मुलीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी ह्रदयद्रावक घटना घडल्याचे संध्याकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड येथील एका महाविद्यालयामागे राहणाऱ्या सुनील बेलदार याने आपल्या चार वर्षाच्या देवराज व सहा वर्षाच्या वैष्णवी या चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला तर १२ वर्षीय संजिवनी हिला गोळ्या व इंजेक्शन देऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यामुळे संशयित क्रूर पिता साठ टक्क्यांपेक्षा अधिक भाजला असून संजिवनीही अत्यवस्थ आहे. या दोघांवर उपचार सुरू आहेत. संशयित सुनीलची पत्नी अनिता हीने घरातील काम, कपडे धुवून झाल्यावर अनेकवेळा मुलांकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण सुनील तिला येऊ देत नव्हता. मुलांचा आवाजही येत नसल्याने अनिताच्या मनात संशय निर्माण झाला. तब्बल तीन-साडेतीन तास सुनीलने अनिताला एका ठिकाणी डांबुन ठेवले होते. सायंकाळी साडेपाच- सहा वाजेच्या सुमारास अनिता स्वयंपाक घरात असतांना सुनील चहा बनविण्यास आला असता अनिताने सुनीलला धक्का देत मुलांच्या खोलीत गेली असता दोन्ही कोवळी मुले निपचित पडलेली होती. तर मोठी मुलगी संजीवनी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती. अनिताने लागलीच घराचा मुख्य दरवाजा उघडून घराबाहेर पळुन गेली. घराजवळील श्री सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळील रिक्षा स्टॅण्डवर अनिता पळत जाऊन रिक्षाचालकांना माझ्या दोन मुलांना मारले, मुलीला वाचवा, पोलिसांकडे चला असे सांगितले. रिक्षाचालक अजित बोटे, शैलेश रोजेकर यांनी जलतरण तलाव येथे नाकाबंदीसाठी असलेले पोलीस हवालदार अशोक तांबे यांना सर्व प्रकार सांगुन घटनास्थळी धाव घेतली. हवालदार तांबे व आजुबाजूच्या रहिवाशांनी त्या ऋणानुबंध बंगल्यात धाव घेतली असता सुनीलने दरवाजाला आतमधुन कडी लावलेली होती. रिक्षाचालकांनी खिडकी उघडून आतमधील पडदा ओढुन खाली पाडला असता संजीवनी पलंगावर अर्धवट बेशुद्ध स्थितीत पडलेली होती. ती दरवाजाची कडी उघडण्यास उठली असता खाली पडली. रिक्षाचालकांनी दरवाजाला लाथा मारून दरवाजा उघडून संजीवनीला उचलुन घेतले. तितक्यात सुनील हातात असलेल्या बाटलीतून अंगावर पेट्रोल ओतुन घेत लायटरने पेटविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या हातातील लायटर रिक्षाचालकांनी खाली पाडले. मात्र ते सुनीलने लागलीच उचलुन स्वत:ला पेटवुन घेत घराबाहेर पडला. हवालदार तांबे व रिक्षाचालकांनी घरातील गोधडी, चादरी सुनीलच्या अंगावर टाकुन आग विझवली. सदर घटनेची माहिती हवालदार तांबे यांनी गस्तीवर असलेले दुय्यम पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांना देताच त्यांनी देखील लागलीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र घरात सुनीलने चार वर्षाचा मुलगा देवराज, मुलगी वैष्णवी यांचा दोरीने गळा आवळुन खुन केल्याचे उघडकीस आले. पोलीस व उपस्थितांनी मयत मुले व जखमी संजीवनी, सुनील यांना त्वरित बिटको रूग्णालयात उपचारा करिता दाखल केले. यामध्ये संजीवनी हीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हत्याकांडाबाबत तर्कवितर्कदोन वर्षापासून माहेरी गेलेल्या पत्नी, मुलीला प्रेमात बोलवुन घरी घेऊन आल्यानंतर जन्मदाता पिता सुनीलने दोघा मुलांचा गळा आवळुन हत्या केली. मोठ्या मुलीला देखील मारण्याचा प्रयत्न केला. घराच्या आतल्या खोलीत छताच्या हुकाला दोरी बांधुन फास तयार करण्यात आला होता. एकावर एक स्टूल ठेवले होते. तसेच पेट्रोलने भरलेली बाटली, किटकनाशकाची बाटली, निळ्या रंगाच्या औषधी गोळ्या, इंजेक्शन असे साहित्य पोलिसांना मिळुन आले आहे. सुनीलला संपूर्ण कुटुंबाची हत्या करायची होती का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. पत्नीशी वाद असेल तर मुलांना पहिले का मारले. पत्नी घराबाहेर कशी पळाली असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सुनीलचे कुठे अनैतिक संबंध होते का याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.