नाशिक : गुढी पाडवा सणाच्या औचित्यावर हिंदू नववर्षाचे स्वागत करत शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत सकाळी शहरासह उपनगरांमधून स्वागतयात्रा काढून नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी नाशिकचे रस्ते फुलून गेले होते.चैत्र शुध्द प्रतिपदेला ‘गुढीपाडवा’ साजरा होतो आणि हिंदू नववर्षालाही प्रारंभ होतो. शहरातील उच्चभू्र परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मानगर, पंडीत कॉलनी, कॉलेजरोड, शरणपूररोड, नरसिंहनगर, तिडके कॉलनी आदि परिसरातून आठ ठिकाणांवरून नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.सिडको, इंदिरानगर, नाशिकरोड, जुने नाशिक, पंचवटी आदि परिसरांमधूनही स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. स्वागत यात्रांमध्ये महिला, युवती पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे स्वागत यात्रांमध्ये पुरूषवर्गही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी बाळगोपाळांनी राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषा करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.दरम्यान, नाशिककरांनी जनजागृतीवरही भर दिला. प्लॅस्टिक मुक्ती, अवयव दान, चिमणी संवर्धन, वृक्षसंवर्धनाविषयी जनजागृती केली. तसेच महिलांनी शहरातून पारंपरिक वेशभूषेत दुचाकी फेरी काढली. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे फलक दर्शवित महिलांनी लक्ष वेधले. शोभायात्रांमध्ये काही महिला घोड्यावर तर काही हत्ती व उंटावरदेखील विराजमान असल्याचे चित्र बघावयास मिळाले. ढोलपथक, लेझीम पथकाने शोभायात्रांमध्ये सहभागी नागरिकांचा उत्साह वाढविला.