नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’,‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’चा जयघोष करीत शेकडो शिवप्रेमींनी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा केला. शिवजयंतीनिमित्त शहरातून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीच्या मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी मंडळांनी ‘डीजे’ला फाटा दिल्याने केवळ ढोल-ताशांचा गजर कानी पडला.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार शहरात बुधवारी (दि. १५) मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरासह उपनगरांमध्ये शिवरायांना अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, मित्रमंडळांची लगबग दिसून येत होती. भगवे ध्वज, पताका आणि शिवरायांच्या सामर्थ्यशाली देदीप्यमान इतिहास सांगणारे पोवाडे दिवसभर कानी ऐकू येत होते.पारंपरिक पद्धतीनुसार संध्याकाळी पाच वाजता जुने नाशिकमधील फाळके रस्त्यावरील मुख्य चौकातून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीमध्ये यंदा बारा मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डोक्यावर भगवा फेटा, हातात भगवा ध्वज आणि भगवा कुर्ता अशा भगवेमय पोशाखात कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत हजेरी लावली होती. नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांनी श्रीफळ वाढवून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मिरवणुकीचा शुभारंभ केला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सोमनाथ तांबे, लक्ष्मण सावजी, रामसिंग बावरी आदि मान्यवर उपस्थित होते.डीजेचा मोह आवरलावाढत्या ध्वनीप्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी पोलीस प्रशासन व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने शिवजयंतीच्या मिरवणूकीत डीजे वापरु नये, असे आवाहन सहभागी मंडळांना केले होते. मिरवणूकीतील सुमारे बारा मंडळांपैकी एकाही मंडळाने डीजेचा वापर केला नाही. यंदाच्या मिरवणूकीचे हे वैशिष्ट ठरले. यामुळे शिवजयंतीची मिरवणूक डीजेमुक्त राहिल्याने शहरातील ध्वनीप्रदूषणाला चांगलाच आळा बसला.