-माधुरी पेठकर‘अती तिथे माती’ ही म्हण सगळ्यांनाच ठाऊक असेल. किंबहुना रोजच्या जगण्यात या म्हणीचा प्रत्यय देणारे अनेक अनुभव आपल्या वाट्याला आलेले असतात. चांगल्या गोष्टींच्या बाबतीतही अती करायला गेलं तरी हाच अनुभव येतो. म्हणून कोणतीही गोष्ट प्रमाणात असं मोठे म्हणतात. आरोग्याला चांगली आहे म्हणून एखादी गोष्ट तुम्ही जर अती सेवन केली तर मग तिचे अपाय शरीरावर होणारंच. हळदीच्याबाबतीतही हे असचं आहे. आतापर्यंत हळदीचे उपयोग, हळद आरोग्याला फायदेशीर कशी हेच वाचत आलोय आपण पण हळदीचे दुष्परिणाम होतात हे कोणी सांगितलं तर? विश्वास नाही बसणार ना? पण हे सत्य आहे. हळदीचं प्रमाणात सेवन हे आरोग्यास हानिकारक असते. यामुळे शरीरास व्याधीही जडू शकतात हे अनेक अभ्यास आणि संशोधनातून पुढे आलं आहे. स्वयंपाकात मसाला म्हणून वापरली जाणारी हळद ती आरोग्यपूर्णच असते. पण अनेकजण वेगवेगळ्या स्वरूपात (हळदीचा अर्क, हळदीचा चहा, हळदीचे ड्रॉप्स, हळद पाण्यात मिसळून घेणं) सेवन करत असतात. या थेट हळद सेवन करण्याचं प्रमाण वैद्यक शास्त्रात ठरलेलं आहे. ते काही प्रत्येकालाच माहित असतं असं नाही. ते प्रमाण जर चुकलं आणि नेहेमीच जर अतीप्रमाणात हळद सेवन केली तर हळदीचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आपल्यालाही जर थेट हळद सेवन करण्याची सवय असेल तर हे दुष्परिणाम वाचा आणि हळदीच्या बाबतीत थोडं सावध व्हा. हळद चांगली आहे म्हणून काय झालं पण तिचा अती वापर त्रासदायक ठरतो हेच सत्य!हळदीचे दुष्परिणाम1) हळदीच्या अती सेवनानं रक्त अती पातळ होतं.रक्ताची गुठळी होत नाही. त्यामुळे ज्यांना रक्त वाहून जाण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी अती हळद सेवन हे घातक आहे.2) पोटाच्या विकारावर हळद घेतली जाते. पण हळदीच्या अती सेवनानं पोटाचे विकार उदभवतातही. हळदीमुळे पोटातील आम्ल अन्न नलिकेत जावून पचनाचे विकार उदभवू शकतात. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना हाडांच्या वेदना होतात त्यांनी थेट हळदीचं सेवन करू नये.3) हळदीमध्ये आॅक्सॅलेट नावाचा घटक असतो. हे आॅक्सॅलेट प्रमाणापेक्षा शरीरात गेलं तर पित्ताशयाच्या खड्यांचा ( गॉलस्टोन्सचा) त्रास होतो. ‘अमेरिकन जर्नल आॅफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासानुसार हळदीमुळे लघवीमधलं आॅक्सॅलेटचं प्रमाण वाढलेलं दिसलं.4) ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी थेट हळद सेवन करणं थांबवायला हवं. कमी रक्तदाबाचा त्रास असलेले जेव्हा थेट हळद आणि तीही अती प्रमाणात सेवन करतात तेव्हा धोका वाढतो.5) हळदीमध्ये असलेल्या आॅक्सॅलेट घटकामुळे किडनी स्टोन होवू शकतात. 6) मेरीलॅण्ड मेडिकल सेंटर विद्यापीठाच्या अभ्यासानुसार गर्भवती स्त्रियांनी स्वयंपाकात जेवढी हळद वापरतो तेवढीच हळद खावी. वेगळी आणि थेट हळद सेवन करू नये. अशा प्रकारच्या हळद सेवनानं अॅलर्जेटिक आजार होवू शकतात. खरंतर गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक टप्पा असतो. तेव्हा हळदीच्या बाबतीतही आहे आरोग्यदायी म्हणून घ्यावी खूप असं करू नये.7) हळदीच्या थेट आणि अती सेवनानं पोटाचे आजार उद्भवतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे हागवण आणि मळमळ. त्यामुळे हळद जरा मर्यादेत घेतलेलीच बरी. हळद थेट घेण्याची सवय असेल तर जरा जागरूकपणे घ्यावी. आपण किती हळद घेतो आहोत? त्याचे चांगले वाईट परिणाम काय जाणवता आहेत याचं निरिक्षण आपणही करायला हवं.8) जे पुरूष थेट ह्ळद सेवन करतात त्यांनी थोडं सावधान. कारण अती हळद सेवनानं शुक्राणूंच्या निर्मितीची गती खुंटते आणि त्यामुळे नपुंसकताही येवू शकते.9) रक्तातील लोह हा अत्यंत महत्त्वाचा घटक. पण हळदीच्या अती सेवनानं हा घटक अन्नातून शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी होते.10) ज्या रूग्णांवर येत्या काळात शस्त्रक्रिया होणार आहे त्यांनी हळदीचं थेट सेवन करू नये. कारण हळदीमुळे रक्त पातळ होतं. शस्त्रक्रियेदरम्यान ही गोष्ट रूग्णासाठी धोकादायक ठरू शकते.11) हळद योग्य प्रमाणात सेवन केली तरचं ती आरोग्यास खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी हळद सेवन करण्याचं योग्य प्रमाण माहित असायला हवं. * हळकुंडापासून बनवलेली हळ्द पूड सेवन करणार असाल तर तिचं तज्ञ्ज्ञांनी सांगितलेलं प्रमाण आहे प्रतिदिन 1.5 य्र 2.5 ग्रॅम. * हळदीचा चहा 15 ग्रॅम हळकुंडाचा तुकडा 135 मीलिलिटर पाण्यात उकळावा.* हळदीचा पाणीस्वरूपातला अर्काचे प्रतिदिन 30 ते 90 थेंब.* हळदीचा अर्काचे 15 ते 30 थेंब प्रतिदिन चारवेळा. हे प्रमाण पाळलं,काही आजार असतांना थेट हळद सेवन करता आहात तर याबाबत वैद्यांचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर हळदीच्या दुष्परिणामांपासून आपण स्वत:ला लांब ठेवू शकतो. हळदीचे आरोग्यदायी फायदे अनुभवायचे असतील तर तिचे दुष्परिणाम हे माहिती असायलाच हवेत म्हणून हा लेख.