शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Agneepath Scheme: सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीरांच्या पगारात काय फरक आहे, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 5:02 PM

1 / 11
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरू आहे. यूपी, बिहारपासून ते तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरपर्यंत १५ हून अधिक राज्यांमधून हिंसक घटनांची नोंद झाली आहे. कुठे ट्रेन जाळली जात आहे, कुठे पोलीस चौकी, बसेस फोडण्यात येत आहे.
2 / 11
ज्या अग्निपथ योजनेची देशात जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक याला केंद्र सरकारचं चुकीचे पाऊल म्हणत आहेत तर काही लोक याकडे सकारात्मक दृष्टीने बघत आहेत. नेमकं अग्निपथ योजनेतील अग्निवीर आणि नियमित सैनिकांच्या पगारात काय फरक असेल? नियमित सैनिकांना जास्त पगार मिळेल का? जाणून घेऊया.
3 / 11
अग्निवीरांना किती पगार मिळेल? - प्रत्येक अग्निवीरला भरतीच्या पहिल्या वर्षात ३० हजार महिन्यांचा पगार मिळेल. अग्निवीरचा पगार दुसऱ्या वर्षी ३३ हजार, तिसऱ्या वर्षी ३६ हजार ५०० आणि चौथ्या वर्षी ४० हजार रुपये होईल.
4 / 11
यातील ७० टक्के रक्कम पगार म्हणून दिली जाणार आहे. उर्वरित ३० टक्के रक्कम अग्निवीर कॉर्प्स फंड म्हणजेच सेवा निधी पॅकेजमध्ये जमा केली जाईल. म्हणजे पहिल्या वर्षी अग्निवीरांना दर महिन्याला २१ हजार रुपये रोख मिळतील. दुसऱ्या वर्षी २३,१०० रुपये, तिसऱ्या वर्षी २५,५८० रुपये आणि शेवटच्या वर्षी २८००० रुपये हाती येतील.
5 / 11
चार वर्षांत पगार कपातीतून एकूण बचत सुमारे ५.०२ लाख रुपये होईल. सरकारही तेवढीच रक्कम या निधीत टाकणार आहे. म्हणजेच पीएफप्रमाणे दुहेरी फायदा होईल. या रकमेवर व्याजही मिळेल. चार वर्षांत बचत आणि वेतन कपातीसह सरकारचे योगदान दोन्ही मिळून सुमारे ११.७१ लाख रुपये येतील. ही रक्कम करमुक्त असेल.
6 / 11
नियमित जवानांच्या पगाराचा नियम काय? - सध्या सैन्यात अधिकारी ते जवानापर्यंत सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि इतर सुविधा दिल्या जातात. सैन्यात १७ हून अधिक प्रकारची पदे आहेत. त्यांच्या पगाराचे वेगवेगळे नियम आहेत.
7 / 11
शिपाई म्हणजे सीमेवर दहशतवाद्यांपासून, शत्रूपासून सीमेचे रक्षण करणारे सैनिक. सातव्या वेतन आयोगांतर्गत लष्करातील हवालदार आणि लान्स नायक यांना दरमहा २१ हजार ७०० रुपये रोख मिळतात. म्हणजे ही रक्कम सैनिकांच्या खात्यात जाते. याशिवाय पगाराच्या २० ते २० टक्के रक्कम पीएफ म्हणून जमा केली जाते.
8 / 11
सैनिकांनाही वेळोवेळी नियमानुसार बढती मिळते. लान्स नायक यांच्यानंतर नायकांचं पद असते. यामध्ये सैनिकांना २५ हजार ५०० रुपये रोख मिळतात. हवालदाराला २९ हजार २००, नायब सुभेदाराला ३५ हजार ४०० रुपये पगार मिळतो. सुभेदाराचा पगार ४४ हजार ९०० रुपये आहे. सुभेदार मेजरला ४७ हजार ६०० रुपये रोख मिळतात.
9 / 11
अग्निवीर आणि नियमित जवानांच्या पगारात काही फरक आहे का? नाही, नियमित सैनिक आणि अग्निवीर कर्मचा-यांच्या पगारात कोणताही फरक नाही. अग्निवीरांचा पगार चार वर्षांसाठी पूर्वनिश्चित आहे, तर सातव्या वेतन आयोगांतर्गत नियमित सैनिकांच्या पगारात दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ केली जाते
10 / 11
सेवेनंतर दोघांच्या सुविधांमध्ये काय फरक आहे? चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरला ११.७१ लाख रुपये एकरकमी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे, निवृत्त सैनिकाला ग्रॅच्युइटी म्हणून एकरकमी रक्कम मिळते. अग्निवीरचे कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा आदी सेवा कालावधीनंतर बंद राहतील.
11 / 11
नियमित सैनिकांना सेवानिवृत्तीनंतरही कॅन्टीन, वैद्यकीय आदी सुविधा मिळत राहातात. याशिवाय सैनिकाला निवृत्तीनंतर आजीवन पेन्शनही मिळते. जे अग्निवीरला मिळणार नाही. परंतु अग्निवीरांना संरक्षण खात्यातील नोकरीत १० टक्के आरक्षण मिळणार आहे.
टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाDefenceसंरक्षण विभाग