२६ व्या वर्षी खासदार ते सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार, असा झाला अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास
By बाळकृष्ण परब | Updated: November 25, 2020 09:14 IST
1 / 10काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. अहमद पटेल यांना सध्याच्या काँग्रेसचे चाणक्य म्हणून म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. आज आपण जाणून घेऊयात अहमद पटेल यांच्या राजकीय प्रवासाविषयी.2 / 10गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे २१ ऑगस्ट १९४९ रोजी जन्मलेल्या अहमद पटेल यांचे वडील इशकजी पटेल हे काँग्रेस नेते आणि भरूचमधील तालुका पंचायतचे सदस्य होते. त्यांचे बोट धरूनच अहमद पटेल हे राजकारणात आले. मात्र पटेल यांनी स्वत:च्या मुलांना मात्र अखेरपर्यंत राजकारणापासून दूर ठेवले होते. 3 / 10अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसचे पंचायत तालुका अध्यक्ष म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभेवर सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून छाप पाडत काँग्रेसमध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित केले होते. 4 / 10अहमद पटेल यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा देशभरात इंदिरा गांधींविरोधात वातावरण असताना पटेल यांनी भरूच लोकसभा मतदासंघातून दणदणीत विजय मिळवत वयाच्या २६ व्या वर्षी लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी गांधी कुटुंबाच्या तीन पिढ्यांसोबत काम केले. पण कधीही मंत्रिपद स्वीकारले नाही. 5 / 10पुढे १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र अहमद पटेल यांनी मंत्रिपद नाकारून संघटनेत काम करण्यास प्राधान्य दिले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनीही त्यांना मंत्रिपद देऊ केले. मात्र तेव्हाही त्यांनी त्यास नकार दिला. अहमद पटेल यांनी राजीव गांधींच्या कार्यकाळात युवा काँग्रेसचे नेटवर्क तयार केले. 6 / 10अहमद पटेल यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून काम पाहिले. १९८६ मध्ये ते गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष बनले. पुढे १९९१ मध्ये नरसिंहा राव यांच्या काळात त्यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य बनवण्यात आले. तिथे ते अखेरपर्यंत कार्यरत होते. 7 / 10१९९६ मध्ये अहमद पटेल काँग्रेसचे कोषाध्यक्ष बनले. २००० मध्ये सोनिया गांधींच्या खासगी सचिवांसोबत झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी हे पद सोडले. मात्र काही दिवसांतच त्यांची सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या संधीचे पुढे त्यांनी सोने केले. 8 / 10सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून त्यांनी काँग्रेसच्या दिल्ली दरबारातील राजकारणात स्वत:ला प्रस्थापित केले. गांधी कुटुंबासोबतच काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले होते. अहमद पटेल यांच्या सल्ल्यांमुळेच सोनिया गांधी भारतीय राजकारणात स्वत:ला प्रस्थापित करू शकल्या, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. 9 / 10अहमद पटेल यांना १० जनपथचे चाणक्य म्हटले जायचे. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत निकटवर्तीय आणि काँग्रेसमध्ली सर्वात शक्तिशाली नेते असलेले अहमद पटेल यांचे व्यक्तिमत्त्व लो प्रोफाइल होते. २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस पक्ष सत्तेत असताना अहमद पटेल यांची राजकीय ताकद सर्वांनी अनुभवली होती. 10 / 10काँग्रेसची संघटनाच नाही तर राज्यांपासून केंद्रापर्यंत स्थापन होणाऱ्या सरकारांमध्ये काँग्रेस नेत्यांचे भवितव्य हे अहमद पटेल निश्चित करत असत. अगदी यूपीए १ आणि यूपीए २ या सरकारांच्या काळात अनेक निर्णय हे अहमद पटेल यांच्या सहमतीनंतर घेण्यात आले होते. एकप्रकारे काँग्रेसचे संघटन आणि सरकार यांचा रिमोट कंट्रोलच अहमद पटेल यांच्याकडे होता.