ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा केली. देशात स्वातंत्र्यानंतर कर प्रणालीत बदल करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात संसदेच्या सेंट्रल हॉलमधे मध्यरात्री विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्याचा हा केवळ चौथा प्रसंग होता. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार, विविध पक्षांचे दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, वर्षभराच्या अंमलबजावणीनंतरच जीएसटीचे नेमके मुल्यांकन शक्य आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम होणार आहे. पण अनेकांना जीएसटी नेमकं आहे इथपासून ते याचा काय परिणाम होणार असे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळेच नेमके असे कोणते बदल घडणार आहेत ज्याचा दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होणार आहे. जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी...जीएसटी म्हणजे काय ?जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, यामुळे व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. सध्या देशात केंद्र आणि राज्य सरकारांचे २० हून अधिक विविध कर करदात्याला भरावे लागतात. जीएसटी लागू झाल्यावर या सगळ्या करांची जागा फक्त एकच कर घेणार आहे तो म्हणजे ‘जीएसटी’. या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे. ‘वन नेशन वन टॅक्स’ या संकल्पनेवर जीएसटी आधारित आहे.राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.जीएसटी लागू झाल्यावर फक्त तीन टॅक्स भरावे लागणार - १. सेंट्रल जीएसटी-हा कर केंद्र सरकार वसूल करेल.२.स्टेट जीएसटी -हा कर राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील करदात्यांकडून वसूल करतील.३.इंटिग्रेटेड (एकत्रित) जीएसटी -दोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल.काय आहेत जीएसटीचे परिणाम -- बँकिंग, टेलिकॉम सेवा, फ्लॅट, तयार कपडे, महिन्याचे मोबाईल बिल आणि टयुशन फी महागणार आहे. - 1 जुलैपासून एसी रेस्टॉरंटमधले खान-पान महागणार आहे, एसी रेस्टॉरंटमध्ये 18 टक्के कर भरावा लागेल तेच नॉन एसी रेस्टॉरंटमध्ये 12 टक्के कर द्यावा लागेल. - मोबाईल बिल, सलून, टयुशन फी तीन टक्क्यांनी महागेल, या सर्वावर 18 टक्के कर लागेल, सध्या या सेवांवर 15 टक्के सेवा कर द्यावा लागतो. - 1 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कपडयांवर 12 टक्के कर द्यावा लागेल, सध्या राज्य सरकाचा 6 टक्के व्हॅट भरावा लागतो. 1 हजारपेक्षा कमी किंमतीच्या कपडयांवर पाच टक्के कर द्यावा लागेल. - फ्लॅट किंवा दुकान घरेदीवर 12 टक्के कर भरावा लागेल सध्या सहा टक्के कर द्यावा लागतो.