शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदींविरोधातील 'G8'चा डाव फसला, नितीश ते ममता बॅनर्जींचाही नकार; आता केजरीवाल खेळणार मोठी खेळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 4:51 PM

1 / 8
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी २०२४ साठी पंतप्रधान मोदींविरोधात कंबर कसली आहे. भाजपा विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा पहिला प्रयोग अपयशी ठरल्यानंतर आता अरविंद केजरीवाल स्वत:च मैदानात उतरणार आहेत.
2 / 8
खुद्द केजरीवालांनीच तसा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २३ मार्च रोजी स्वातंत्र्यसेनानी भगतसिंह यांच्या शहीद दिवशी होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात 'आप'चं 'मोदी हटाओ, देश बचाओ' अभियान सुरू होणार आहे आणि ते २०२४ पर्यंत चालणार आहे.
3 / 8
आता ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे दिल्लीत अशाच स्वरुपाच्या घोषणा असलेल्या पोस्टर्सवरून वाद सुरू आहे. 'आम आदमी' पक्षानेही अप्रत्यक्षपणे दिल्लीभर लावलेल्या पोस्टर्सचे नाव न छापता त्यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. हा पोस्टर वाद हा पक्षाच्या प्रचाराचा पहिला भाग असल्याचं मानलं जात आहे.
4 / 8
आता हा नारा देत दिल्ली आणि पंजाबचं सरकार मोदी सरकारविरोधात आघाडी उघडणार आहेत. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अभियान सुरू करणार आहेत. संपूर्ण देशात निराशेचे वातावरण असून लोकशाहीचा आवाज दाबला जात आहे. 'मोदी हटाओ, देश बचाओ'चा नारा देशभरात दिला जाईल. तुमची हुकूमशाही देश सहन करणार नाही. तुम्ही आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असंही राय म्हणाले.
5 / 8
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही सुरुवात असल्याचं पक्षातील सूत्रांचं म्हणणं आहे. २०२४ ची निवडणूक 'मोदी विरुद्ध केजरीवाल' अशी होणार असल्याचं अनेक आप नेत्यांनी आधीच सांगितलं आहे. नुकतंच एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, १८ मार्च रोजी केजरीवाल यांनी देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत डिनरसाठी आमंत्रित केलं होतं, ज्यामध्ये मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला जात होता.
6 / 8
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
7 / 8
मोदी विरोधक आता एकत्रित येण्याच्या मनस्थितीत सध्या तरी नाहीत अशा स्थितीत केजरीवाल आता एकटेच मोदींच्या विरोधात मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. येत्या काही दिवसांत ते देशव्यापी मोहीम राबवणार आहेत.
8 / 8
मोहीम आक्रमकपणे चालवल्यानंतर इतर पक्षही त्यात सामील होतील, अशी आम आदमी पार्टीची अपेक्षा आहे. सध्या लोकसभेत 'आप'चा एकही खासदार नाही. पण पुढच्या वर्षी भाजपला पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून मोदींना थेट लढत दिली होती. पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी