Big obstacle in the construction of Ram Mandir, how to build? The question arose
राम मंदिराच्या उभारणीत मोठा अडथळा, बांधकाम करायचे कसे? निर्माण झाला प्रश्न By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 4:47 PM1 / 11अनेक वादविवाद आणि वर्षानुवर्षे चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीच्या बाजूने कौल दिला होता. या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी करून प्रत्यक्ष मंदिराच्या बांधकामाला सुरुवातही झाली होती. मात्र आता राम मंदिराच्या उभारणीच्या मार्गातील मोठा अडथळा समोर आला आहे. 2 / 11मंदिराच्या बांधणीत गुंतलेल्या इंजिनियर्सना काही तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मंदिराच्या बांधकामासाठी जेव्हा २०० फूट खोल खाली मातीची तपासणी केली तेव्हा तेथील माती ही वालुकामय असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारची माती केवळ दगडांनी उभारण्यात येणाऱ्या मंदिराचा भार उचलण्यास फारशी सक्षम नसते. 3 / 11 राम जन्मभूमीमध्ये गेल्या महिनाभरापासून पायलिंगचे खोदकाम करून मातीचे नमुने तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र मंदिराच्या बांधकामात गुंतलेल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीला या ठिकाणी योग्य मातीचा थर मिळालेला नाही. त्यामुळे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टसमोर आव्हान उभे राहिले आहे. 4 / 11 .ही बाब समोर आल्यानंतर आता मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एका सब कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये देशातील नामांकित आणि प्रतिष्ठित तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश आहे. ते मंदिराच्या पायाभरणीबाबत आपला सल्ला देतील. 5 / 11शरयू नदीच्या किनाऱ्यावर असल्या कारणाने पायामध्ये मिळत असलेली वाळू मंदिराच्या भक्कमतेबाबत शंका निर्माण करत आहे. त्यातच पायलिंग चाचणीदरम्यान, एक पिलरसुद्धा थोडासा सरकला होता. याचे कारण जमिनीच्या खाली असलेला शरयूचा थर असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते कोणे एके काळी या रामजन्मभूमीच्या जवळून शरयू नदी वाहत असावी. 6 / 11निर्मिती संस्थेचे तज्ज्ञ आणि ट्रस्टच्या सदस्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता तांत्रिक उपसमितीच्या अहवालानंतर मंदिराच्या बांधकामाच्या पायाभरणीची सुरुवात नव्याने करण्यात यावी, असे निश्चित झाले आहे. आता तज्ज्ञांच्या संशोधनाचा अहवाल लवकरच येणार आहे. आता या अहवालानंतरच राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. वाळूच्या थरावर पाया भक्कम कसा करता येईल, याबाबत संशोधन सुरू आहे. हे संशोधन आठ दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर बांधकामाचे काम पुढे नेले जाईल. 7 / 11तुलसीदास यांनी जेव्हा रामचरित मानसची रचना केली होती. तेव्हा शरयू नदी ही रामजन्मभूमीच्या अधिकच जवळून वाहत होती. त्यामुळे येथील भूजलपातळीचा स्तरसुद्धा अन्य भागांपेक्षा खूप वर आहे. तसेच या कारणामुळे जमिनीखाली वाळूचा थर आहे.8 / 11 राम जन्मभूमीच्या बांधकामामध्ये विटांऐवजी दगडांच्या ताशीव शिळांचा वापर करण्यात येणार आहे. या शिळांचे वजन हे अधिक असणार आहे. उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचे आयुर्मान हे किमान एक हजार वर्षांचे असावे, असा राम मंदिर बांधत असलेल्या ट्रस्टचा विचार आहे. त्यामुळेच राम मंदिराच्या खांबांमध्ये लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात येणार नाही. कारण लोखंडाच्या सळ्या ह्या लवकर गंज पकडतात. 9 / 11तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर ठरवण्यात आले की, ज्याप्रकारे नदीमध्ये बांधकाम करण्यासाठी पिलर बोअर केले जातात. त्याप्रकारे राम मंदिरासाठी अत्याधुनिक मशिनींचा वापर करून पायाच्या स्तंभांना जमिनीत बोअर केले जाईल. यामध्ये चाचणीनंतर निवडण्यात आलेल्या दगडांची खडी आमि उच्च क्षमतेच्या सीमेंटमध्ये वेगळ्या प्रकारची रसायने मिसळून त्यांची क्षमता वाढवली जाईल. त्यानंतर हे मिश्रण मशिनीच्या माध्यमातून पिलरसाठी खोदण्यात आलेल्या खोल होलामध्ये टाकले जाईल. हे मिश्रण सुकल्यानंतर पिलर दगडामध्ये परिवर्तीत होईल. 10 / 11राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १२०० स्तंभ उभारण्यात येणार आहेत. त्याच्या चाचणीसाठी १२ स्तंभांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र चाचणीदरम्यान, यापैकी काही स्तंभ हे खाली घसरले. चाचणीचे हे काम आयआयटी चेन्नईच्या तज्ज्ञांनी केले होते. त्यानंतर राममंदिराचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी तज्ज्ञांनी संशोधन सुरू केले आहे. हा संशोधन अहवाल लवकरच येणार आहे. 11 / 11तज्ज्ञांच्या मते पिलर्स आपापसात जोडून पायाचे बांधकाम तयार करण्यात येईल. पायाचे बांधकाम तयार झाल्यानंतर तासलेले दगड क्रमवार पद्धतीने जोडले जातील. या शिळा अशा प्रकारे तयार करण्यात आल्या आहेत की त्या एकमेकांच्या खाचीमध्ये फिट होतील. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी अन्य गोष्टींची आवश्यकता भासणार नाही. काही ठिकाणी जोडकामात चांदीच्या पत्र्यांचा वापर केला जाईल. तसेच या शिळा एकमेकांवर स्थापित करण्यासाठी अत्याधुनिक क्रेनचा वापर केला जाईल. एका अंदाजानुसार राम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा अवधी लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications