शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ; नितीश कुमारांनी सर्व 7 मंत्रिपदे BJP ला दिली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:05 IST

1 / 6
Bihar Cabinet Expansion: दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा बिहारकडे वळवला आहे. राज्यात पुन्हा NDA ची सत्ता आणण्यासाठी भाजपने स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. विशेष म्हणजे जदयु प्रमुखांनी सातही रिक्त जागा भाजपला देऊन टाकल्या आहेत. यापूर्वी भाजपच्या कोट्यातून तीन आणि जडयुच्या कोट्यातून दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता नितीश यांनी मोठे मन दाखवत सर्व जागा भाजपला दिल्या आहेत.
2 / 6
या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. अशा परिस्थितीत नितीश सरकारमचा मंत्रिमंडळ विस्तार अतिशय महत्वाचा मानला जात आहे. राज्यात एनडीएचे सरकार आहे. युतीत भाजप, JDU, HAM, LJP (R) चा समावेश आहे. जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. तर, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे त्यांचे सहकारी म्हणून भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री आहेत. मागील काही काळापासून भाजपचा विजयरथ रोखणे विरोधकांना अशक्यप्राय झाले आहे. अशा परिस्थितीत, नितीश कुमारांनी भाजपला ज्यास्त मंत्रिपदे देऊन मुख्यमंत्रिपद सुरक्षित केल्याचे बोलले जात आहे.
3 / 6
सध्या नितीश मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 29 असून, सध्या 7 पदे रिक्त आहेत. सध्या भाजपचे 14, जेडीयूचे 13, एचएएमचे 1 आणि एक अपक्ष मंत्री आहेत. आता भाजपच्या कोट्यातून सात नवे चेहरे सामील होणार आहेत. अशा स्थितीत भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांची संख्या 21 होईल, तर मुख्यमंत्री नितीश यांच्यासह जेडीयूचे 13 मंत्री मंत्रिमंडळाचा भाग राहतील. बिहारमध्ये जदयुचा मुख्यमंत्री असेल, पण राज्यात भाजप मोठा भाऊ आहे, असे दाखवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
4 / 6
2020 च्या सुरुवातीला बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले, तेव्हा एनडीएने सर्वाधिक 125 जागा जिंकल्या होत्या, तर महाआघाडीला 110 जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. पण, आश्वासनाप्रमाणे भाजपने नितीश कुमार यांना सातव्यांदा मुख्यमंत्री बनवले. पण 2022 मध्ये नितीश यांनी भाजपशी संबंध तोडले आणि लालू प्रसाद यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केले.
5 / 6
दोन वर्षांनंतर, 2024 मध्ये नितीश यांनी पुन्हा विचार बदलला आणि एनडीए कॅम्पमध्ये सामील झाले. त्यांनी पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली. भाजपनेही पुन्हा नितीश यांना आपला मोठा भाऊ बनवले आणि सर्वात मोठा पक्ष असूनही, नितीश यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांची नेता म्हणून निवड केली. नितीश 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत भाजपने बिहारमध्ये 17 जागांवर निवडणूक लढवली आणि 12 जागांवर विजय मिळवला. नितीश यांच्या पक्षाने 16 जागांवर निवडणूक लढवली आणि 12 जागा जिंकल्या.
6 / 6
आता विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ आली, तेव्हा नितीश यांनी मोठे मन दाखवले आणि रिक्त झालेल्या सातही जागांवर भाजपचे मंत्री करण्याचे मान्य केले. एनडीए 2025 च्या निवडणुका नितीश यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा दावा करत आहे. अशा परिस्थितीत नितीश यांना पुन्हा मुख्यमंत्री करुन भाजप सर्वाधिक मंत्रिपदे आपल्याकडे ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.
टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस