शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 4:02 PM

1 / 9
ईशान्येकडील मणिपूर राज्य हिंसाचार आणि द्वेषाच्या आगीत जळत आहे. हे राज्य शांत होण्याचं चिन्ह नाही. गेल्या ३ मे पासून मैतेई(Meitei) आणि कुकी(Kuki) समुदायांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतभेद आहेत. कुकी समुदाय डोंगराळ भागात राहतो, तर मैतेई समुदाय पर्वतांच्या पायथ्याशी राहतो. त्यांचा अनुसूचित जमातीत समावेश करायचा की नाही यावरून दोन समाजात वाद आहे.
2 / 9
मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये, असे कुकी समाजाचे मत आहे. मणिपूरच्या चुरचंदपूरमध्ये ३ मे रोजी या मुद्द्यावर निदर्शनं झाली, त्यानंतर सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. राज्यात १०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर ५० हजारांहून अधिक लोकांना घरे सोडावी लागली आहेत.
3 / 9
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू असून हिंसाचार रोखण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे १०,००० हून अधिक सैनिक तेथे तैनात करण्यात आले आहेत. तर मणिपूरमध्ये सीआरपीएफ आणि बीएसएफचे ७ हजारांहून अधिक जवान तैनात आहेत.
4 / 9
याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीएफच्या ५२ तुकड्या, रॅपिड अॅक्शन फोर्सच्या १० तुकड्या बीएसएफच्या ४३ तुकड्या, आयटीबीपीच्या ४ तुकड्या आणि एसएसबीच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
5 / 9
मात्र त्यानंतरही हिंसाचार थांबत नाही की मृतांचा आकडा कमी होत नाही, दोन दिवसांपूर्वी येथे एका गावात संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर १० हून अधिक जण जखमी झाले होते. दोन समुदायातील या वादात आता दहशतवादी संघटनांचाही उतरल्याचा दावा केला जातोय.
6 / 9
राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, सुमारे ३०० सशस्त्र दहशतवादी म्यानमारमधून मणिपूरच्या बिष्णुपूरमध्ये दाखल झाले आहेत आणि कुकी लोकवस्तीच्या चुराचंदपूरकडे जात आहेत. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह देखील या घुसखोरांना आणि दहशतवाद्यांना हिंसाचारासाठी जबाबदार धरत आहेत,
7 / 9
ही हिंसा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील लढाईचा परिणाम आहे असं मुख्यमंत्री म्हणतात तर यावर लष्कराची भूमिका त्यांच्या अगदी विरुद्ध आहे, कारण लष्कराने आधीच सांगितले आहे की, मणिपूरमधील सध्याच्या हिंसाचाराचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही आणि हा दोन जातींमधील संघर्ष आहे.
8 / 9
कुकी आणि मैतेई समुदायात खूप वाईटरित्या विभाजन झाले आहे आणि त्यांच्यातील द्वेषाची भिंत दिवसेंदिवस मोठी होत आहे. परिस्थिती इतकी तणावपूर्ण आहे की कुकी लोक मैतेईचे वर्चस्व असलेल्या इंफाळमध्ये येण्यास घाबरत आहेत, तर मैतेई समुदायाचे लोक कुकी भागात जाण्याचे टाळत आहेत.
9 / 9
पोलिस आणि लष्करावरही पक्षपातीपणाचा आरोप होत आहे. तर कुकी समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि त्यांच्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित करताना मैतेई समाजाचे लोक आसाम रायफल्सवर आरोप करत आहेत.
टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार