शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनमध्ये हाहाकार; पण भारतात कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता नाही! वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 3:53 PM

1 / 13
चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. झिरो कोविड पॉलिसीनंतर आता कोरोना रुग्णांच्यां संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा लाखो लोकांना संसर्ग झाला आहे. तसेच अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.
2 / 13
वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. धडकी भरवणारं चित्र सध्या चीनमध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयं खचाखच भरली आहेत. एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत.
3 / 13
मृतांचा आकडा वाढल्याने शवागृहही भरली आहे. मृतदेहांचे ढीग पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. चीनमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भारतासह अनेक देशांची चिंता वाढली आहे.
4 / 13
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार का? असा प्रश्न लोकांना आता पडला आहे. तसेच भारत अलर्ट झाला असून खबरदारीच्या उपाययोजना पुन्हा लागू करण्याच्या मार्गावर आहे. भारताला कोरोनाचा कितपत धोका हे जाणून घेऊया...
5 / 13
देशातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात चीनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही कमी आहे. देशाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना केला आहे. गेल्या वर्षी डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता होती पण असं झालं नाही. तसेच 20 डिसेंबरला 3559 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
6 / 13
अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसच्या बायोसायन्सेज अँड हेल्थ रिसर्च डिपार्टमेंटचे डीन अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लोकांच्या रोगप्रतिकारकशक्ती ही खूप जास्त आहे. तसेच अनेक लोक हे ओमायक्रॉनने संक्रमित झाले आहेत. तसेच काहींना डेल्टाची देखील लागण झाली होती.
7 / 13
भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण देखील करण्यात आलं आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रभाव जाणवणार नाही. आपण आधीच या सगळ्याची किंमत चुकवली आहे असं अनुराग अग्रवाल यांनी म्हटलं आहे. तसेच चीनमध्ये जे होत आहे त्याचा भारतावर परिणाम होणार नाही कारण येथे नवा व्हेरिएंट आलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 13
जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असताना केंद्र सरकारने खबरदारी म्हणून मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना पॉझिटिव्ह नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग करण्याचे आवाहन केले आहे. यामुळेच विषाणूची प्रसाराची क्षमता किती आहे, याची माहिती मिळते व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते.
9 / 13
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे देशातील नवीन प्रकाराचा वेळेवर शोध घेणे शक्य होईल. जिनोम सिक्वेंसिंग ही अशी चाचणी आहे ज्यामध्ये आरएनए रेणुचा उपयोग करून आनुवंशिक माहिती मिळविली जाते. याशिवाय या विषाणूत किती बदल झाले आहेत, तो शरीरात कसा प्रवेश करतो आणि त्याची संसर्ग क्षमता काय आहे अशी सर्व माहिती यातून मिळते.
10 / 13
देशात सध्या कोरोनाचे आठवड्याला 1200 रुग्ण आढळत आहेत. जगात सध्या आठवड्याला 35 लाख प्रकरणे नोंदविली जात आहेत. कोरोनाचा वेग मंदावला असला तरी तो अजून गेलेला नाही. लोकांना मास्क लावण्याचा सल्ला वारंवार देण्यात येत आहे. तसेच संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
11 / 13
'चीनमधील परिस्थितीबद्दल भारताला काळजी करण्याची काहीच गरज नाही. चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. वयस्कर लोकसंख्येमध्ये, बहुतेक लोकांना लसीकरण केले गेले आहे, असं डॉ. एनके अरोरा म्हणाले.
12 / 13
कोरोनाचे आतापर्यंत जेवढे व्हेरिएंट जगात आले आहेत, त्यांचे व्हेरियंट देशात आढळून आली आहेत. अशा परिस्थितीत काळजी न करता फक्त काळजी घेण्याची गरज आहे, असंही अरोरा म्हणाले. भारत आणि चीनच्या परिस्थितीत फरक आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाचा स्फोट झाला आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले नाही.
13 / 13
वृद्ध लोकसंख्येमध्ये, बऱ्याच लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. आतापर्यंत 60 वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्येपैकी 87% लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण केले आहे, पण 80 वर्षांवरील वृद्धांपैकी फक्त 66.4% लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत