Congress's 'bad day' before the Lok Sabha! So far in 2024, 12 leaders left party
लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम... By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 7:10 PM1 / 14 Congress LokSabha Election: केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून अनेक दिग्गज विरोधी नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसलाय. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. 2024 मधील अवघ्या चार महिन्यात अनेक बड्या आणि 'कट्टर' काँग्रेसी नेत्यांनी पक्षाला रामाराम केला आहे. गौरव वल्लभ, अशोक चव्हाण, संजय निरुपम ते मिलिंद देवरा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे.2 / 14 गौरव वल्लभ-काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज(दि.4 एप्रिल) सकाळी पक्षाचा राजीनामा दिला आणि दुपारीप भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. भाजपवर टीका करण्यात वल्लभ आघाडीवर असायचे. पण, गेल्या काही दिवासांपासून त्यांनी कुठल्याही टीव्ही दिबेटमध्ये भाग घेतला नव्हता. त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.3 / 14 अनिल शर्मा- बिहार काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल शर्मा यांनीही तीन दिवसांपूर्वी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. अनिल शर्मा यांनी काँग्रेस हायकमांडवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला. पप्पू यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अनिल शर्मा नाराज होते. आधी त्यांनी बिहार काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.4 / 14 अजय कपूर- बिहारचे सहप्रभारी आणि एआयसीसी सचिवपद भूषवलेले अजय कपूर हे राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या जवळचे मानले जायचे, मात्र आता ते भाजपमध्ये आहेत. अजय हे कानपूरच्या राजकारणाचा मोठा चेहरा मानले जातात. अजय कपूर तीन वेळा कानपूरमधून आमदार राहिले आहेत. काँग्रेसने त्यांना कानपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली, मात्र त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.5 / 14 राजेश मिश्रा- काँग्रेसचे दिग्गज नेते राजेश मिश्रा यांनीही गेल्या महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला. राजेश मिश्रा हे वाराणसीचे खासदार राहिले असून त्यांनी प्रदेश उपाध्यक्षपदही भूषवले आहे. राजेश मिश्रा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत होते. राजेश मिश्रा हे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे सदस्यही राहिले आहेत.6 / 14 मिलिंद देवरा- महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी जानेवारीत काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दक्षिण मुंबई लोकसभेसाठी देवरा आग्रही होते, पण आघाडीत ही जागा अरविंद सावंत यांना मिळाली. अखेर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. 7 / 14 अशोक चव्हाण- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही फेब्रुवारीमध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण प्रत्येक अडचणीत पक्षाच्या पाठीशी उभे असायचे. 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांनी नांदेडचा गड राखला, पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रताप पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.8 / 14 संजय निरुपम- महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी वक्तव्याचा कारण देत काँग्रेसने संजय यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. काँग्रेसनेही स्टार प्रचारकांच्या यादीतूनही निरुपम यांचे नाव काढून टाकले होते. महाराष्ट्रातील मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने संजय निरुपम हे पक्षावर नाराज होते. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही.9 / 14 विजेंदर सिंग-आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये देशाला नावलौकिक मिळवून देणारा विजेंदर सिंग काँग्रेसचा हात धरून राजकारणात आला. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी विजेंदर सिंहने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. विजेंदर सिंगने 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, पण त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता तो भाजपमध्ये सामील झाला आहे.10 / 14 बाबा सिद्दीकी- महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मुंबईतील अल्पसंख्याक समाजातील बड्या नेत्यांपैकी एक असलेल्या बाबा सिद्दीकी यांनी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस सोडली. बाबा सिद्दीकीस 48 वर्षे काँग्रेसमध्ये होते, पण अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.11 / 14 विभाकर शास्त्री- प्रियंका गांधींचे राजकीय सल्लागार असलेले विभाकर शास्त्री यांनीही अलीकडेच काँग्रेसला रामराम केला. फेब्रुवारीत विभाकर शास्त्री यांनी काँग्रेस सोडली आणि त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. विभाकर शास्त्री हे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. 12 / 14 आचार्य प्रमोद कृष्णम- काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. काँग्रेसने अनुशासनहीनतेच्या आरोपाखाली ज्येष्ठ नेते आणि अध्यात्मिक गुरू आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. राम मंदिराबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर आचार्य प्रमोद कृष्णम चांगलेच संतापले होते. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही.13 / 14 रोहन गुप्ता- काँग्रेसचे प्रवक्ते असलेले रोहन गुप्ता यांनी मार्चमध्येच काँग्रेस सोडली. पक्ष सोडण्यापूर्वी रोहन गुप्ता यांनी अहमदाबाद (पूर्व) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही मागे घेतली होती. रोहन गुप्ता यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा पाठवून पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.14 / 14 अर्जुन मोढवाडिया- अर्जुन मोधवाडिया हे गुजरातमधील सर्वात ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र गेल्या महिन्यात राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये पोहोचण्यापूर्वीच आमदारकी आणि पक्ष सोडला. सुमारे 40 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले मोढवाडिया गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. ते पोरबंदरमधून काँग्रेसचे आमदार होते. आणखी वाचा Subscribe to Notifications