शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coromandel Express Accident: कोरोमंडल 128KM तर यशवंतपूर एक्सप्रेस 126KM वेगाने...,असा झाला अपघात; रेल्वे विभागाने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 3:00 PM

1 / 6
Coromandel Express Accident: ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 288 मृत्यू तर 1100 लोक जखमी झाले आहेत. आता रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. रेल्वे बोर्डाचे सदस्य जया वर्मा यांनी सांगितले की, बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार रेल्वे स्टेशनवर 2 जून रोजी सायंकाळी 6.55 वाजता हा अपघात घडला.
2 / 6
कोरोमंडल एक्सप्रेस स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनवर धडकली. या अपघातात इतर दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातावेळी दोन मेल एक्स्प्रेस याच स्टेशनवरुन वेगवेगळ्या दिशेने जाणार होत्या. लूप लाईनवर या दोन्ही गाड्या आल्या. कोरोमंडल एक्सप्रेस शालिमार रेल्वे स्थानकावरून हावडा दिशेहून चेन्नईला जाण्यासाठी येत होती.
3 / 6
ट्रेनला हिरवा सिग्नलही देण्यात आला होता, सर्व काही सेट होते. ओव्हरस्पीडिंगचा प्रश्नच नव्हता, हिरवा सिग्नल असल्यामुळे पायलटने ट्रेन सुरुच ठेवली. ग्रीन सिग्नलमुळे चालकाने ठरलेल्या वेगानुसार(128km) ट्रेन न थांबता पुढे निघाला. समोरुन यशवंतपूर एक्स्प्रेसही ताशी 126 किमी वेगाने येत होती. दोन्ही ट्रेनला हिरवा सिग्नल मिळाला होता, त्यामुळे त्यांनी ट्रेन थांबवली नाही.
4 / 6
यावेळी कोरोमंडल ट्रेन समोर उभ्या असलेल्या मालगाडीवर धडकली आणि पटरीवरुन खाली उतरली. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या यशवंतपूर एक्सप्रेसची या कोरोमंडल एक्सप्रेसला धडक बसली आणि ती ट्रेनदेखील पटरीवरुन उतरुन हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. तात्काळ स्थानिक लोक बचावासाठी धावले.
5 / 6
रेल्वे बोर्डाच्या सदस्याने सांगितले की, रेल्वे मंत्री गेल्या 36 तासांपासून घटनास्थळी आहेत आणि सर्व ऑपरेशन्सवर लक्ष ठेवून आहेत आणि ते बचाव कार्यातही मदत करत आहेत. प्राथमिक तपासानुसार आतापर्यंत जी कारणे समोर आली आहेत, त्यानुसार सिग्नलिंगमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला आहे. सध्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यांचा तपास पूर्ण होईपर्यंत अधिक काही सांगता येणार नाही.
6 / 6
या अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची मदत जाहीर झाली आहे. तसेच, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना 2 लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातOdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात