शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशात कोरोनाची नवीन लाट? केंद्राने 'या' राज्यांना केले सतर्क; रुग्णसंख्येत वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 6:12 PM

1 / 7
नवी दिली : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा वेग पुन्हा झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली, तेलंगणा आणि तमिळनाडू राज्यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे. दिल्लीत शुक्रवारी 2 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. तर शुक्रवारी महाराष्ट्रात 1 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
2 / 7
आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रात या राज्यांना इन्फ्लूएंझा सारख्या आजार आणि कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर योग्यरित्या लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल. या राज्यांना पत्र लिहून केंद्राने या राज्यांच्या कोरोना प्रकरणावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे सुचवले आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाची प्रकरणे आणि पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या राज्यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
3 / 7
5 ऑगस्ट रोजी दिल्लीत नोंदलेल्या 2202 कोरोना प्रकरणांचा संदर्भ देत पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत दररोज 811 प्रकरणे समोर येत आहेत. सरासरी प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. जिथे 29 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात दररोज सरासरी 802 प्रकरणे होती, तिथे 5 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात सरासरी 1492 वर पोहोचली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट देखील 5.90 वरून 9.86 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.
4 / 7
दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 19406 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 49 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या आकडेवारीत केरळमध्ये 11 मृत्यू झाले आहेत. 19,928 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,34,793 आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4,34,65,552 लोकांना कोरोनावरील उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, देशात आतापर्यंत 5,26,649 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. डेली पॉझिटिव्हिट रेट 4.95 टक्के असल्याचे नोंदवले गेले आहे.
5 / 7
देशात केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. केरळमध्ये 12,344 रुग्ण सक्रिय आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 12,077 रुग्ण सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 11,067 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यानंतर तामिळनाडूमध्ये 10,987 आणि पंजाबमध्ये 10,858 आहेत.
6 / 7
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या 11906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 2190 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,95,954 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
7 / 7
येत्या काही दिवसांत रक्षाबंधनासोबतच उत्तर भारतातही सणासुदीला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. जगभरात कोरोनाचे आगमन झाल्यापासून, एकूण प्रकरणांमध्ये भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि एकूण मृत्यूच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस