corona vaccination clinical trial of covaxin on children begins at AIIMS Patna
Corona Vaccine: कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 6:32 PM1 / 12पाटणा: कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. 2 / 12कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून पावले उचलायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. 3 / 12कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता देशातील २ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. 4 / 12भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर ट्रायल करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली.5 / 12कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर २ ते १८ वयोगटातील मुलांवर लस चाचणी सुरु करण्यात आली आहे. देशातील एकूण ५२५ मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे. 6 / 12चाचणीसाठी मुलांचे वय किमान २ वर्षे असायला हवे, असे स्पष्ट करण्यात आले असून, यासाठी पाटणा येथील एम्समध्ये लहान मुलांवर ट्रायल करण्यास सुरुवात झाली आहे.7 / 12पाटणा येथील एम्समध्ये तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला. कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी एकूण १५ मुले आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड करण्यात आली होती. 8 / 12त्याआधी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यात ३ मुले चाचणी करण्यासाठी योग्य असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला. पहिला डोस दिल्यानंतर या मुलांना जवळपास २ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.9 / 12पहिला डोस घेतलेल्या मुलांवर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. आता या मुलांना लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लसीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जात आहे.10 / 12कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देत आहे. ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. 11 / 12लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे खाटा व उपचाराची रचना करताना वेगळी व्यवस्था करावी लागेल. प्रामुख्याने या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील, ही तज्ज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील करोना उपचाराला प्राधान्य देण्यातआल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 12 / 12दरम्यान, यापूर्वी अमेरिकेतील कॅनडा येथे १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फायझर लसीचा डोस त्यांना देण्यात येणार आहे. लहान मुलांना कोरोनाची लस देणारा अमेरिका पहिलाच देश ठरला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications