शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: “उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 7:48 PM

1 / 12
लखनऊ: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली, तरी वाढणारे मृत्यू चिंता वाढवत आहेत.
2 / 12
कोरोना संकटासह काळ्या बुरशीच्या आजाराचे नवे आव्हान देशासमोर उभे ठाकले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
3 / 12
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यास बहुतांशी यश आले असून, उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
4 / 12
राज्य सरकारच्या कायदा विषयक विभागाने तयार केलेल्या करोनासंदर्भातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळताना राज्य सरकार २०२० पासूनच चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे म्हटले आहे.
5 / 12
राज्यातील दर १० लाख लोकसंख्येमागे कोरोना मृतांचा आकडा ४७ इतका आहे. अमेरिका आणि युरोपमधील प्रगत राष्ट्रांमध्ये अधिक चांगल्या आरोग्य सुविधा असूनही तेथे दर १० लाखांमागे १८०० ते २१०० जणांचा मृत्यू झाले आहेत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
6 / 12
बेजबाबदार पद्धतीने कारभार केल्यामुळे इतर राज्यांमध्ये आणि देशांमध्ये कोरोना मृतांचा आकडा जास्त आहे. या उलट उत्तर प्रदेशमध्ये कोरोनासंदर्भातील नियोजन, चाचण्या आणि उपचारांवर भर देत आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
7 / 12
भारताशी तुलना केल्यास अमेरिका आणि युरोपमध्ये खूप चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत. मात्र या देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि तेथील मृत्यूचा दर हा खूप जास्त आहे. अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी आहे आणि तिथे सहा लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
8 / 12
तर भारतामध्ये १३५ कोटी लोकसंख्या असताना तीन लाख २५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एखाद्याचा मृत्यू होणे सुद्धा वाईट गोष्ट आहे. जीव वाचवण्याचा प्रत्येक स्तरावर प्रयत्न झाला पाहिजे. कमकुवत आरोग्य व्यवस्था असतानाही भारताने इतर देशांपेक्षा चांगली कामगिरी केली, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
9 / 12
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहे. पहिल्या काही दिवसांमध्ये उपचार सुरू केले नाही तर रुग्णांची प्रकृती चिंताजन होण्याची आणि कोरोनानंतरही आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता या लाटेत अधिक होती.
10 / 12
सरकारने १४ तज्ज्ञांचा समावेश असणारी सल्लागार समिती नेमली होती. या समितीच्या सल्ल्यानुसार सरकार काम करत आहे. ग्रामीण भागात कोरोना पसरणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
11 / 12
कोरोनाविषयी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. अनेक प्रकरणांमध्ये लोकांना योग्य माहिती नसल्याचे दिसून आले. खास करुन ग्रामीण भागात हा प्रकार अधिक होता.
12 / 12
अनेक ठिकाणी लोकांनी कोरोनाला देवी समजले आणि ते त्याची पूजा करू लागले. कोरोनासारख्या आजारात काळजी घेणे हेच उत्तम आहे. मात्र तरीही काही जण आजारी पडले तर त्यांना वेळेत उपचार मिळायला हवेत, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण