Coronavirus: संपूर्ण देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला, पण या भागात संसर्ग पसरू नाही शकला, जाणून घ्या कारण By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 2:39 PM
1 / 7 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र देशातील असाही एक भाग आहे जिथे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना पोहोचू शकला नाही. 2 / 7 हा भाग पश्चिम राजस्थानमधील भारत-पाकिस्तान बॉर्डरवर स्थित जैसलमेर जिल्ह्यामध्ये आहे. जैसलमेर जिल्हा मुख्यालयापासून १२५ ते २५० किमी पर्यंत शाहगड भागाचा आकार खूप मोठा आहे. शेकडो किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेल्या या भागात सुमारे १० हजार लोकसंख्येचे वास्तव्य आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोना येथे पोहोचू शकलेला नाही. हा परिसर आतापर्यंत कोरोनाच्या साथीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. 3 / 7 यामागचं कारण वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली होती. त्यांचे पालन येथील रहिवासी अनेक वर्षांपासून करत आले आहेत. 4 / 7 दुसऱ्या लाटेमध्ये जैसलमेर जिल्ह्यातील २०६ पैकी २०३ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र शाहगड आणि गतवर्षी या ग्रामपंचायतीचे विभाजन करून तयार करण्यात आलेल्या अन्य दोन ग्रामपंचायती हरनाऊ आणि मांधला येथे कोरोना पोहोचू शकला नाही. हा वाळवंटी भाग येथील भौगोलिक परिस्थितीसोबत येथील रहिवाशांच्या परस्परामधील आपलेपणासाठीही प्रसिद्ध आहे. 5 / 7 जिल्हा मुख्यालयापासून शेकडो किमी दूर असलेल्या या ग्रामस्थांपर्यंत कोरोना न पोहोचण्याचे कारण येथील ग्रामस्थांचा बाहेरील लोकांशी फारसा नसलेला संपर्क हे आहे. जैसलमेर जिल्ह्यातील दोन डझन ग्रामपंचायती सीमाभागामध्ये गणल्या जातात. मात्र केवळ तीन ग्रामपंचायती कोरोनापासून वाचल्याने प्रशासनाकडूनही येथील ग्रामस्थांच्या जीवनशैलीचे कौतुक केले जात आहे. 6 / 7 जैसलमेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायणसिंह चारण यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील शहरांसोबत गावांपर्यंतही संसर्ग दिसून आला होता. अशा परिस्थितीत शाहगड परिसरातील तीन ग्रामपंचायतींनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी या सीमाभागामधील रहिवाशांचे कौतुक केले पाहिजे. येथील रहिवाशांची घरे दूर दूर अंतरावर आहेत. तसेच हे लोक विनाकारण इकडे तिकडे फिरतही नाहीत. 7 / 7 या परिसरातील लोकांचे एक वेगळेच जग आहे. येथील लोकांचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क फार कमी आहे. घोटारूपासून मुरार आणि मांधला पासून जनिया गावापर्यंत ऐन आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या शाहगड परिसरामध्ये तब्बल १० हजार लोकवस्ती आहे. प्रामुख्याने पशुपालन करणाऱ्या या ग्रामस्थांचा बाहेरील जगाशी फारसा संपर्क येत नाही. मोजके लोक सामान घेण्यासाठी सम, रामगड किंवा जैसलमेरच्या बाजारापर्यंत जातात. ते स्वत:सोबतच इतरांसाठीही खरेदी करून नेतात. आणखी वाचा