CoronaVirus Live Updates : रुग्णांच्या जीवाशी खेळ! Remdesivir चोरलं अन् कोरोनाग्रस्तांना पाण्याचं इंजेक्शन दिलं; खळबळजनक घटना By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 4:16 PM
1 / 15 देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या दोन कोटीवर पोहोचली आहे. याच दरम्यान दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 15 देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच रुग्णालयात बेडची कमतरता तसेच ऑक्सिजनचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. 3 / 15 अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. 4 / 15 कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. 5 / 15 कोरोनाच्या संकटात आवश्यक असलेल्या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनी आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राजस्थानमधील कोटा येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 6 / 15 कोरोना रुग्णांवर उपचाराकरिता उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remedisivir Injections) काळाबाजार करताना दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता एक मोठा खुलासा झाला आहे. 7 / 15 एका भावाने दोन रुग्णांचं रेमडेसेवीरचं इंजेक्शन चोरलं आणि त्यानंतर रुग्णांना त्याऐवजी पाण्याचं इंजेक्शन टोचलं. जे औषध त्यांनी चोरलं होतं ते जास्त दराने विक्री करण्यासाठी आपल्या जवळ ठेवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 8 / 15 पोलिसांनी या दोन्ही भावांकडून 2 इंजेक्शन्स जप्त केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे बुंदी जिल्ह्यातील निमोदा गावचे रहिवासी असून ते सख्खे भाऊ आहेत. हे दोघं सध्या महावीर नगरमध्ये राहत आहेत. 9 / 15 15 मे रोजी या दोघांनी अटक करण्यात आली आहे. यातील मनोज हा पोलीस रिमांडमध्ये असून दुसऱ्याला कारागृहात पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णु कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. 10 / 15 'मनोज रेगर कोटा हार्ट हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत होता. या रुग्णालयात भरती असलेल्या रतनलाल आणि माया नावाच्या दोन रुग्णांचे रेमडेसिवीर इंजेक्शन चोरल्याचं मनोज याने चौकशीदरम्यान कबूल केलं आहे.' 11 / 15 'इंजेक्शन चोरल्यानंतर त्यात पाणी भरल्याचंही त्याने सांगितलं. मनोजचा भाऊ राकेश हा रुग्णालयाजवळील एका लॅबमध्ये नोकरी करतो. तो कोविड वॉर्डमधील रुग्णांचे सॅम्पल्स घेण्यासाठी रुग्णालयात येतो' अशी माहिती दिली. 12 / 15 कोटा मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय सरदाना यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार आली होती. खासगी हॉस्पिटलमधील स्टाफ धोका देत रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती डॉ. सरदाना यांना मिळाली होती. 13 / 15 डॉ. सरदाना यांनी अटेंडंट असल्याचे भासवत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक ऑपरेशन राबवत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 15 काही दिवसांपूर्वी एका रुग्णालयात नर्स उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना भलतंच नॉर्मल इंजेक्शन देऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करत असल्याची घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर ती आपल्या प्रियकराला याचा पुरवठा करुन हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकत होती. 15 / 15 मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, प्रेमासाठी रुग्णांच्या जीवाशी असा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली. इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी भोपाळ पोलिसांनी जेव्हा एका तरुणाला ताब्यात घेतलं तेव्हा हे सत्य समोर आलं होतं. आणखी वाचा