शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंता वाढली! देशात वेगाने पसरतोय नवा कोरोना, 20 जणांना लागण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:49 AM

1 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,02,44,853 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,48,439 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 16
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,550 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 286 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे.
3 / 16
देशभरातील कोरोना संसर्गाचा वेग थोडा मंदावत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसच्या या नवीन प्रकाराने आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
4 / 16
भारतातही कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळले आहेत. या सहाही जणांना अलगीकरणात ठेवले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली होती. मात्र त्यानंतर आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
5 / 16
कोरोना व्हायरसच्या नवा स्ट्रेनचा वेग वाढला असून तो भारतामध्येही झपाट्याने पसरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. नवा स्ट्रेन आढळलेल्या देशातील रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे.
6 / 16
ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना याची लागण झाली आहे. या 20 जणांपैकी 8 जण हे दिल्लीमधील आहेत. आतापर्यंत 107 सँपल्सचा रिपोर्ट आला आहे. यामध्ये 20 जण आढळून आले आहेत.
7 / 16
NCDC दिल्लीमध्ये 14, कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये 7, NIV पुणे येथे 50, निमहंसमध्ये 15, IIGB मध्ये 6 सह एकूण 107 सॅम्पलची तपासणी झाली.यामध्ये दिल्लीमध्ये 8 कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये 1 निमहंसमध्ये 2, NIV पुणे 7 आणि अन्य दोन लॅबमध्ये 2 जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
8 / 16
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ब्रिटनहून परतलेल्या एका कुटुंबातील सदस्यांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये देखील कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.
9 / 16
कुटुंबातील सदस्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी देण्यात आले. यामध्ये 4 जणांच्या कुटुंबातील 2 वर्षीय चिमुकलीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
10 / 16
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंब राहत असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या प्रशासनाकडून चाचण्या केल्या जात आहेत.
11 / 16
ब्रिटनहून आलेल्या 565 जणांशी आरोग्य विभागाचा कोणताही संपर्क होत नसल्यानं चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागानं अनेकदा पुढे येण्याचं आवाहन करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
12 / 16
ब्रिटनहून एकूण 1 हजार 655 जण उत्तर प्रदेशात आले. त्यांची यादी केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला दिली. यातील 1 हजार 90 प्रवाशांशी संपर्क साधण्यात यश आलं आहे. मात्र उर्वरित प्रवाशांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यातील बहुतांश जणांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत.
13 / 16
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
14 / 16
ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी 7 जानेवारीपर्यंत कायम असेल. याआधी सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ही बंदी वाढवण्यात आली आहे.
15 / 16
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं 21 डिसेंबरला महत्त्वाचा निर्णय घेतला. ब्रिटनहून भारताकडे येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला.
16 / 16
निर्णयाची अंमलबजावणी 22 डिसेंबरला रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी सुरू झाली. हा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत लागू होता. मात्र नव्या स्ट्रेनचा धोका कायम असल्यानं या बंदीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता 7 जानेवारीपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूक बंद असेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत