शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: कोरोनाचा सी. १.२ नवा विषाणू; लसीलाही दाद देणार नाही, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 9:15 AM

1 / 6
दक्षिण आफ्रिका व इतर अन्य देशांत आढळलेला कोरोनाचा सी. १.२ हा नवा विषाणू अधिक घातक तसेच कोरोना लसीलाही दाद न देणारा असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे.  नॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर कम्युनिकेबल डिसिजेस (एनआयसीडी) व क्वाझुलू-नाताल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेंटिंग प्लॅटफॉर्म यांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दक्षिण  आफ्रिकेत हा विषाणू गेल्या मे महिन्यात आढळून आला होता. 
2 / 6
आतापर्यंत चीन, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड या देशांमध्ये सी. १.२ ह्या विषाणूचे अस्तित्व आढळले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाची पहिली लाट सी.१ या विषाणूमुळे आली होती. त्याच्या तुलनेत सी.१.२ या विषाणूची संसर्गशक्ती अधिक आहे. तसेच या विषाणूची उत्परिवर्तने कोरोनाच्या अन्य विषाणूंपेक्षा जास्त आहेत.
3 / 6
दक्षिण आफ्रिकेत सी. १.२ या विषाणूचा प्रसार वाढत आहे. असेच चित्र या देशात बीटा व डेल्टा विषाणूंबाबत आहे.  सी.१.२. या विषाणूच्या उत्परिवर्तनाचे प्रमाण दर वर्षाला ४१.८ इतके आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराने आधीच जगात हाहाकार माजविला आहे. आता सी. १.२ या विषाणूच्या घातक क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 
4 / 6
जागतिक स्तरावर कोरोना विषाणूंच्या उत्परिवर्तनापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. या विषाणूची संसर्गशक्ती इतर विषाणूंपेक्षा अधिक आहे असेही वैद्यकीय तज्ज्ञांना आढळून आले आहे. सी.१.२ हा विषाणू शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्याच्या प्रक्रियेतही बाधा निर्माण करतो असे दिसून आले आहे. जगभरात ज्या कोरोना लसी विकसित झाल्या आहेत, त्यांना हा विषाणू दाद न देण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
5 / 6
महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या चिंतेचे कारण बनली आहे. महामारीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी तिसरी लाट कमी घातक असेल, असे म्हटले. या अभ्यासाने ऑक्टाेबर आणि नोव्हेंबरमध्ये ही लाट कमाल उंची गाठेल व तेव्हा रोज एक लाख लोकांना बाधा होईल, अशी शंका व्यक्त केली आहे. आयआयटीचे (कानपूर) काॅम्प्युटर सायन्स तज्ज्ञ मणिंद्र अग्रवाल म्हणाले की, जर विषाणू नव्या रूपात आला नाही तर स्थिती बदलण्याची शक्यता नाही.
6 / 6
दरम्यान, देशात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ४२,९०९ रुग्ण आढळले तर ३८० जणांचा मृत्यू झाला. यामुळे देशात मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,३८,२१० झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,७६,३२४ झाली असून एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १.१५ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५१ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ७,७६६ रुग्णांची भर पडली आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ६३.४३ कोटी लोकांना कोरोना विषाणूवरील लस दिली गेली आहे, असेही निवेदनात म्हटले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतSouth Africaद. आफ्रिका