covid cases rise in china may increase inflation in india know how
Covid Impact India: कोरोनाचा कहर चीनमध्ये, पण भारतात फुटणार महागाईचा 'बॉम्ब', 'ही' आहेत महत्वाची कारणं... By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 4:27 PM1 / 7चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तर जपान, अमेरिकासह इतरही देशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. पण याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो आणि देशात महागाईचा बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. औषधांपासून सोन्यापर्यंत अशा अनेक गोष्टींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भारत अनेक आवश्यक वस्तूंसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. 2 / 7जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढला असताना यावेळी व्हायरसचा BF7 व्हेरिअंट अधिक घातक सिद्ध होत आहे. गेल्या १० दिवसांत या विषाणूचा प्रसार वेगानं वाढतो आहे. चीन, जपान, अमेरिकेपासून तैवानपर्यंत कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे भारतीय कंपन्या चिंतेत आहे. कारण कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी निर्बंध लादले जातात आणि यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होतो. परिणामी वस्तूंच्या किमती गगनला भिडतात. 3 / 7इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, औषधांपासून सोनं आणि डायमंड एक्स्पोर्ट कंपन्यांना पुरवठा साखळी बाधित होण्याची चिंता आतापासूनच सतावत आहे. शेजारील देश चीनमध्ये दिवसागणिक परिस्थिती गंभीर होत असताना फॅक्ट्रीतील उत्पादन प्रभावित होऊ लागलं आहे. भारतातील महागाईचं सर्वात मोठं कारण म्हणजे चीनहून मोठ्या प्रमाणावर केली जाणारी आयात. पुरवठा साखळी जर बाधित झाली तर भारतात वस्तूंची साठेबाजी होईल आणि यातून किमती वाढतील. 4 / 7औषधांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. तो चीनहूनच आयात करावा लागतो. चीनहून भारतात येणाऱ्या जैविक रसायनांमध्ये एपीआयचा देखील समावेश आहे. याचा वापर औषधं तयार करण्यासाठी केला जातो. भारतातील ६० टक्के बल्क औषधांसाठीचा कच्चा माल चीनहून आयात केला जातो. त्यामुळे आयातीवर परिणाम झाला तर फार्मा कंपन्या मोठ्या संकटात सापडतील. अशात औषधांच्या किमती गगनला भिडण्याची शक्यता आहे. 5 / 7चीनहून भारत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स आयात करतो. चीनमधील कोरोनाची सद्यस्थिती पाहता स्मार्टफोन ब्रँड्सना सुटे भाग आयातीत मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कारण भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात चीनी कारखान्यांमधून येणाऱ्या पार्ट्सवर अवलंबून आहेत. 6 / 7जगात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली की सोन्याच्या किमतीतही वाढ होते. कोरोना महामारीच्या याआधीच्या लाटेतही सोन्याच्या किमती गगनाला भिडल्याचं पाहायला मिळालं होतं. तज्ज्ञांच्या मतानुसार ज्या वेळी आर्थिक तंगी होते तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणुकीवर भर देण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. अशात शेअर बाजारात भूकंप होतो आणि सोन्याच्या किमती वाढतात. 7 / 7याशिवाय भारतीय गारमेंट मॅन्युफॅक्चर आणि एक्सपोर्टर्स कंपन्या चीनहून अॅक्सेसरीज मागवतात. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुरवठ्यावर परिणाम होतो त्यामुळे ब्रँड्सना वेगवेगळे पर्याय शोधावे लागतात. यासोबतच ऑटो पार्ट्सचा सप्लाय देखील थंड होतो. याचा परिणाम किमतीवर होतो आणि गाड्यांच्याही किमती वाढतात. आणखी वाचा Subscribe to Notifications