शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या 60 टक्के रुग्णांनी घेतली नव्हती लस"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:58 AM

1 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,33,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 525 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 14
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 4,89,409 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या 60 टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याचं म्हटलं जात आहे.
3 / 14
एका खासगी रुग्णालयाने केलेल्या रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे. मॅक्स हेल्थकेअरने केलेल्या रिसर्चमध्ये असे नमूद केले आहे की तिसऱ्या लाटेदरम्यान नोंदवले गेलेले बहुतेक मृत्यू हे 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे होते.
4 / 14
काही रुग्णांना किडनीचे आजार, हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर अशा अनेक आजारांनी ग्रासले होते. आमच्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 82 मृत्यू झाले. त्यापैकी 60 टक्के लोक असे होते ज्याचं कोरोना लसीकरण झालेलं नव्हतं.
5 / 14
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (आरोग्य) यांनी ज्या रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि ज्यांना इतर आजार आहेत त्यांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचं म्हटलं आहे.
6 / 14
कोरोनाच्या तीन लाटेच्या तुलनात्मक रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, तिसऱ्या लाटेदरम्यान फक्त 23.4 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज होती. तर दुसऱ्या लाटेत 74 टक्के आणि पहिल्या लाटेत 63 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज होती.
7 / 14
रिसर्चमध्ये मॅक्स नेटवर्कच्या सर्व रुग्णालयांमध्ये कोविड-19 मुळे 41 मुलांना दाखल करण्यात आले होते. मात्र या वयोगटातील एकही मृत्यू झालेला नाही. सात मुलांना बालरोग अतिदक्षता विभागात (आयसीयू) तर दोन मुलांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते असं म्हटलं आहे.
8 / 14
रुग्णालयाने सांगितले की, एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेत दिल्लीत 28000 रुग्ण आढळले, तेव्हा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची उपलब्धता शून्य होती. सध्याच्या लाटेत, गेल्या आठवड्यात जेव्हा मोठ्या संख्येने प्रकरणे नोंदवली गेली, तेव्हा बेडच्या उपलब्धतेचं कोणतंही संकट नव्हतं.
9 / 14
रिपोर्टमध्ये पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेदरम्यान रूग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या अनुक्रमे 20,883, 12,444 आणि 1378 होती. पहिल्या लाटेत एकूण मृत्यू दर 7.2 टक्के होता, जो दुसऱ्या लाटेत 10.5 टक्के झाला.
10 / 14
सध्याच्या लाटेत मॅक्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूदर सहा टक्के नोंदवला गेला आहे.गेल्या 10 दिवसांत दाखल झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि दररोज अधिकाधिक मृत्यू नोंदवले जात आहेत. ओमायक्रॉनमुळे किरकोळ संसर्ग होत आहे.
11 / 14
रुग्णालयाने कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून 20 जानेवारी 2022 पर्यंत रिसर्च केला आहे. मॅक्स हेल्थकेअरचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ. संदीप बुध्दिराजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा रिसर्च करण्यात आला.
12 / 14
शुक्रवारी दिल्लीत संसर्गाचे 10,756 नवीन प्रकरणे आणि 38 मृत्यूची नोंद झाली आहे. तर संसर्ग दर 18.04 टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय राजधानीत तिसऱ्या लाटेदरम्यान, 13 जानेवारी रोजी 28,867 प्रकरणे नोंदवली गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 14
वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा देशातील अनेक ऱाज्यांमध्ये संसर्ग झाला आहे. काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या ही दहा हजारांवर गेली आहे. तर दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
14 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली