शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cyrus Mistry: 'सायरस मिस्त्री यांना रुग्णालयात आणलं तेव्हा...'; डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं नेमकं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 10:07 AM

1 / 6
अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (५४) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
2 / 6
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं डॉक्टरांनी कारण सांगितलं आहे. डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितले की, सायरस मिस्त्रींच्या डोक्यावर मार बसला होता. मृत्यूचं कारणही तेच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच अपघात होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जहांगीर पंडोल यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दोघांना जेव्हा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा दोघांचाही मृत्यू झाला होता.
3 / 6
दरम्यान, मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी मिस्त्री यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करत शोकसंवेदना व्यक्त केल्या.
4 / 6
रतन टाटा यांनी निवृत्ती घोषित केल्यानंतर सायरस यांनी २०१२ ते २०१६ या काळात टाटा उद्योगसमूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. शापूरजी पालनजी उद्योगाकडे टाटा सन्सचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. मात्र सायरस तेव्हा फार प्रसिद्धीच्या झोतात नसल्याने अनेकांना त्यांच्या निवडीनंतरच त्यांच्या कामाची ओळख पटली. पुढे मतभेद झाल्याने त्यांना पदावरून दूर केले होते.
5 / 6
रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते अहमदाबादवरून मर्सिडिजने मुंबईला येत होते. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीवर बांधलेल्या नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलाच्या भिंतीला धडकली. ही दुर्घटना एवढी भीषण होती, की मिस्त्री बसलेल्या भागाच्या दिशेने समोरून गाडीचे प्रचंड नुकसान झाले.
6 / 6
एअर बॅग असूनही जोरदार धडकेमुळे मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चार प्रवाशांपैकी सायरस मिस्त्री व जहांगीर दिनशा पंडोल यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अनायता पंडोल व डेरियल पंडोल हे दोघे गंभीर जखमी झाले. मिस्त्री, जहांगीर यांच्या मृतदेहाचे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.
टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAccidentअपघातTataटाटा