शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूट सूट सूट! फेसबुककडून भाजपला मोठं डिस्काऊंट; १० निवडणुकांमधील धक्कादायक आकडे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 3:41 PM

1 / 9
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं जोरदार कामगिरी केली. पाचपैकी चार राज्यांत असलेली सत्ता भाजपनं कायम राखली. उत्तर प्रदेशातील सत्ता राखत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपनं दमदार कामगिरी केली आहे. यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे.
2 / 9
सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेसबुक सत्ताधारी भाजपकडून जाहिरातीसाठी कमी दर आकारत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या २२ महिन्यांत भाजप आणि इतर पक्षांनी सोशल मीडियावर केलेला खर्च, त्यांच्या जाहिरातींसाठी फेसबुक आकारत असलेला दर यातून ही आकडेवारी समोर आली आहे.
3 / 9
गेले २२ महिने आणि १० निवडणुकांमधील आकडेवारीचं विश्लेषण केल्यास समोर येणारी माहिती चक्रावून टाकणारी आहे. या १० निवडणुकांमध्ये २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचाही समावेश आहे. विरोधी पक्षाकडून जाहिरातीसाठी अधिक पैसे घेणाऱ्या फेसबुकनं भाजपला मात्र मोठी सवलत दिली आहे. अल जझिरानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
4 / 9
भाजप फेसबुकचा भारतातील सर्वात मोठा राजकीय ग्राहक आहे. फेसबुक जाहिरातीसाठी कमी दर आकारत असल्याचा मोठा फायदा भाजपला निवडणुकीत होतो. त्यामुळे विरोधकांच्या पुढे राहण्यात भाजपला मदत होते. द रिपोटर्स कलेक्टिव्ह (टीआरसी) या भारतीय कंपनीनं आणि ad.watchनं याबद्दलची आकडेवारीच प्रसिद्ध केली आहे.
5 / 9
२२ महिन्यांतील ५ लाख ३६ हजार ७० राजकीय जाहिरातींचा अभ्यास करण्यात आला. फेब्रुवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत फेसबुकवर दिसलेल्या राजकीय जाहिरातांचा अभ्यास केला गेला. त्यासाठी ऍड लायब्ररी ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसचा वापर केला गेला.
6 / 9
भाजप, भाजपचे उमेदवार आणि त्यांच्याशी संबंधित संस्था यांच्यासाठी भाजपनं जाहिरातीसाठी आकारलेला दर विरोधी पक्षाच्या जाहिरातीसाठी आकारण्यात आलेल्या दरापेक्षा कमी आहे. एक जाहिरात दहा लाख वेळा दाखवण्यासाठी भाजपला ४१ हजार ८८४ रुपये मोजावे लागतात.
7 / 9
भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला फेसबुकवर जाहिरात द्यायची असल्यास त्यासाठीचा दर अधिक आहे. काँग्रेसनं दिलेली जाहिरात १० लाख वेळा दाखवण्यासाठी फेसबुकनं सरासरी ५३ हजार ७७६ रुपये आकारले आहेत. याचा अर्थ भाजपच्या तुलनेत फेसबुक काँग्रेसकडून घेत असलेली रक्कम २९ टक्के अधिक आहे.
8 / 9
गेल्या २२ महिन्यांत भाजपनं फेसबुकवरील जाहिरातींवर १० कोटी ३७ लाख २४ हजार ४८० रुपये खर्च केले. तर काँग्रेसनं फेसबुकवर जाहिराती देण्यासाठी ६ कोटी ४१ लाख ८० हजार ९९९ रुपये मोजले. फेसबुक भाजपला जाहिरातीत सवलत देत असल्यानं त्यांना १ कोटी १६ लाख ७५ हजार ८१२ रुपयांचा फायदा झाला.
9 / 9
भाजपचा प्रचार करणाऱ्या घोस्ट आणि सरोगट जाहिरातदारांवर फेसबुकनं कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र अशाच प्रकारच्या जाहिराती विरोधकांच्या बाजूनं असल्यास त्यावर फेसबुकनं कारवाई केल्याचं दिसून आलं आहे. अशा जाहिराती फेसबुकनं थेट ब्लॉक केल्या आहेत.
टॅग्स :Facebookफेसबुकcongressकाँग्रेसBJPभाजपा