शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२९ वर्षांपूर्वी आज भारतात पहिल्यांदा झालं होतं मोबाईलवरून संभाषण, कुणी केलेला कॉल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 8:18 PM

1 / 6
आज हातात मोबाईल असणं ही अगदी सामान्य बाब बनली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ फोन करण्यासाठी आणि बोलण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या मोबाईल तंत्रज्ञानाने आता खूप मोठी प्रगती केली आहे. मात्र ९० च्या दशकात अशी परिस्थिती नव्हती. साधा लँडलाईन फोन घेणंसुद्धा सर्वसामान्यांना परवडणारं नव्हतं. तिथे मोबाईल तर कल्पनेपलिकडे होता.
2 / 6
अशा परिस्थितीत बरोबर २९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ जुलै १९९५ रोजी भारतात पहिला मोबाईल कॉल केला गेला होता. त्या एका फोन कॉलबरोबर भारतात मोबाईलचं युग सुरू झालं होतं.
3 / 6
३१ जुलै १९९५ रोजी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकाता येथील रॉयटर्स बिल्डिंगमधून राजधानी नवी दिल्लीतील संचार भवन येथे बसलेले केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना फोन केला होता.
4 / 6
हा फोन करण्यासाठी ज्योती बसू यांनी नोकियाचा मोबाईल फोन वापरला होता. तसेच मोदी-टेल्स्ट्रा या कंपनीच्या नेटवर्कच्या माध्यमातून हा फोन कॉल केला गेला होता. मोदी-टेल्स्ट्रा ही संयुक्त कंपनी होती. त्यातील बी. के. मोदी ही भारतीय कंपनी होती. तर टेल्स्ट्रा ही ऑस्ट्रेलियन कंपनी होती.
5 / 6
'मोदी टेल्स्ट्रा' भारतात मोबाईल सेवा सुरू करणारी पहिली कंपनी होती. या सर्व्हिसचं नाव मोबाईल नेट असं ठेवण्यात आलं होतं. या सर्व्हिसला लोकांपर्यत पोहचवण्यासाठी नोकिया हॅंडसेटटी मदत घेतली गेली. 'मोदी टेल्स्ट्रा' नंतर स्पाइस टेलिकॉम ही कंपनी सेवा देऊ लागली. 
6 / 6
मात्र त्या काळात कॉल रेट प्रचंड महाग होते. एका मिनिटाच्या फोन कॉलसाठी ८.४ रुपये प्रतिमिनिट एवढा दर त्यावेळी आकारला जात असे. आज इनकमिंग कॉल फ्री आहे. मात्र त्याकाळात इनकमिंग आणि आऊटगोईंग अशा दोन्ही कॉलसाठी पैसे आकारले जायचे.
टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारत