ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - अमोघ वक्तृत्वाच्या बळावर अमेरिकी संसदेलाही डोलवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दोन वर्षातला अडतिसावा विदेश दौरा होता. 32 देशांना मोदींनी एकदा भेट दिली, पाच देशांना दोन वेळा भेट दिली तर दशकभर व्हिसा नाकारलेल्या अमेरिकेला सर्वाधिक म्हणजे चार वेळा नरेंद्र मोदींनी भेट दिली. मेडिसन स्क्वेअर ते अमेरिकी सिनेट अशा सगळ्या स्तरांवर मोदींनी आपली छाप पाडली असून भारतीय जनमानसही मोदींमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावत असल्याचे मानत आहे. मोदींच्या विदेश दौऱ्यांची फलश्रुती वाढत्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये जशी दिसून आली आहे, तशीच ती मोठ्या प्रमाणावरील करार मदारांमध्येही दिसून आली आहे. उदाहरणार्थ...6 व 7 जून 2015 या बांग्लादेशला दिलेल्या भेटीमध्ये पंतप्रधानांनी बांग्लादेशसोबत तब्बल 22 करार मार्गी लावले. सीमाप्रश्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या करारासोबतच शिंपिंग, पाणीप्रश्न, वाहतूक, मानवी वाहतूक अशा अनेक करारांचा समावेश आहे. तर, दुसरीकडे आपला दौरा अत्यंत आटोपशीर व शक्य तेवढा स्वस्त ठेवण्याकडेही मोदींचा कल असतो. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामध्ये कमीत कमी प्रशासकीय अधिकारी असतात आणि पत्रकारांचा ताफा बरोबर नेण्याचेही टाळण्यात येते. गेल्या वर्षीच्या कॅलिफोर्निया व न्यू यॉर्कच्या भेटीमध्ये मोदींचा दिनक्रम बघितला तर याची कल्पना येऊ शकते. जागतिक स्तरावर भारताची पत वाढलीय का, असा प्रश्न मोदी सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन लोकमतने एका पोलच्या माध्यमातून गेल्या महिन्यात विचारला होता. तीन हजारांपेक्षा जास्त सहभागी असलेल्या या पाहणीमध्ये 83.4 टक्के वाचकांनी भारताची जागतिक स्तरावर पत वाढली असल्याचे मत नोंदवले. अवघ्या 12.7 टक्के वाचकांनी प्रतिकूल मत दिले तर उरलेल्या 3.9 टक्के वाचकांनी तटस्थ राहणे पसंत केले होते.