शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today: सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशीही स्थिर; येत्या काळात किंमती वाढणार, जाणून घ्या आजचे दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:06 PM

1 / 7
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे. एकीकडे सोन्याचे दर स्थिर असताना चांदीच्या दरात मात्र 400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 67,500 रुपये मोजावे लागणार आहेत.
2 / 7
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत किरकोळ बदल होताना दिसत आहेत. गेल्या सहा दिवसांचा विचार करता सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर पुढचे तीन दिवस सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे.
3 / 7
गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
4 / 7
गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
5 / 7
अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं होणारी घसरण पाहता ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.
6 / 7
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
7 / 7
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी