शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 12:18 PM

1 / 10
इस्रायल इराणवरील हल्ल्यात आण्विक प्रकल्पांना उडवून देऊ शकतो, अशी शक्यता जागतीक स्तरावर व्यक्त केली जात आहे. इस्रायलने हे यापूर्वीही केले आहे. इराणसाठीच इराकवर हल्ला चढवून इराकचा अणू प्रकल्प हवाई हल्ल्यात उध्वस्त केला होता. अशातच एका जागतिक पत्रकाराने मोठा दावा केला आहे. इस्रायल आणि भारत मिळून पाकिस्तानचा अण्वस्त्र प्रकल्पच उडविण्याची तयारी केली होती, परंतू सगळी तयारी होत असतानाच बातमी लीक झाल्याने पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश बनला होता.
2 / 10
१९८१ मध्ये इराकचा ओसिरक अणू प्रकल्प तीन देशांच्या सीमा ओलांडून उध्वस्त करण्याचा प्लॅन इस्रायलने यशस्वी केला होता. जर भारताने इस्रायलचे मॉडेल स्वीकारले असते तर पाकिस्तानला अण्वस्त्रे बनविण्यापासून रोखता आले असते या चर्चांना उधाण आले आहे. इस्रायल आणि भारत यांच्यात औपचारिक राजनैतिक संबंध 1992 मध्ये स्थापित झाले खरे परंतू ही गोष्ट 1984 ची आहे.
3 / 10
पाकिस्तानला काहीही करून अण्वस्त्रधारी बनायचे होते. 1971 च्या बांगलादेश युद्धानंतर पाकिस्तान भारताशी बदला घेण्यासाठी पेटून उठला होता. 1965 मध्येच पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी अणुबॉम्ब बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी पाकिस्तानने चारा खाऊन दिवस काढले तरी चालतील परंतू अणुबॉम्ब बनविणारच असे वक्तव्य केले होते. बांगलादेश युद्धानंतर त्यांनी यावर काम सुरु केले.
4 / 10
युरोप आणि चीनमधून चोरलेल्या डिझाइन्स आणि तंत्रज्ञानावर पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम अवलंबून होता. पाकिस्तान याचे उत्पादन भारताविरोधात करण्यासाठीच करत असल्याचे जगजाहिर होते. परंतू तिकडे मध्य पूर्वेत इस्रायल अस्वस्थ झाला होता.
5 / 10
इस्लामाबादजवळील कहूता येथे पाकिस्तान अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भारताला मिळाली होती. भारताला आपल्याविरोधात त्याचा वापर होईल याची खात्री होतीच परंतू पाकिस्तानचा 'इस्लामिक अणुबॉम्ब' आपल्या अरब प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठी ताकद बनेल याची भीती इस्रायलला वाटू लागली होती.
6 / 10
इथून पुढे सगळी सुत्रे हलली आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ आणि इस्रायलची मोसाद यांच्यात दोस्ती सुरु झाली. दोन्ही देश मिळून पाकिस्तानच्या आण्विक केंद्रांवर हल्ला करून ते नष्ट करतील असा प्लॅन बनविला गेल्याचे या विषयावरील तज्ञांनी सांगितले. तेवढ्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला भनक लागली.
7 / 10
त्यानंतर लगेचच अमेरिकेच्या वृत्तपत्रांत बातम्या येऊ लागल्या. 1982 मध्ये वॉशिंग्टन पोस्ट आणि 1984 मध्ये अमेरिकेच्या एबीसी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले होते. यामुळे भारतावर थेट कारवाई करण्याचा दबाव वाढू लागला होता. बांगलादेश युद्धावेळी भारतद्वेष्ट्या अमेरिकेने पाकिस्तानला कशी मदत केलेली हे सर्वांना माहिती आहेच. या सगळ्याच्या मागेही अमेरिकाच होती.
8 / 10
पत्रकार एड्रियन लेवी यांनी त्यांच्या फसवणूक: पाकिस्तान, अमेरिका आणि जागतिक शस्त्रास्त्रांचा कट या पुस्तकात लिहिले आहे की, इराकच्या प्रकल्पावर हल्ला केल्या नंतर भारतीय अधिकारी इस्रायलला गेले होते. यात सैन्य अधिकारी आणि रॉचे अधिकारीही होते. इस्रायलकडे असलेली अमेरिकी लढाऊ विमाने एफ-16 आणि एफ-15 लढाऊ विमाने भारताच्या जामनगर एअर बेसवर येणार होती.
9 / 10
गुजरातहून उड्डाण करून ही विमाने पाकिस्तानमध्ये घुसून इस्लामाबादजवळील कहूता येथील अण्वस्त्र केंद्रांवर हल्ले चढविले जाणार होते. याची पुष्टी होऊ शकली नाही हे वेगळे असले तरी अनधिकृत माहितीनुसार इंदिरा गांधी यांनी १९८४ मध्ये या ऑपरेशनला मंजुरी दिली होती.
10 / 10
काश्मीरच्या डोंगराळ भागातून रडारला टाळत इस्रायली विमाने पुढे जाणार होती व इस्लामाबादजवळ खुल्या पठारावरून लक्ष्य भेद केले जाणार होते. परंतु अमेरिकेच्या सीआयएने पाकिस्तानला या ऑपरेशनबद्दल सावध केले आणि हा प्लॅन फसला. भारतावर कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढू लागताच इस्रायल न घाबरता पुढे झाला आणि आपणच भारताला ही ऑफर दिली होती, असे कबूल करत भारतावरील सारे आरोप आपल्यावर घेतले होते. या पत्रकारानुसार अमेरिकेच्या दगाबाजीमुळे आज पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश बनला आहे. याबाबतचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.
टॅग्स :Israelइस्रायलPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिका