भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध भडकल्यास किती जीवितहानी होणार? धक्कादायक आकडेवारी आली समोर By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 3:29 PM
1 / 9 भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी असलेले देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही देश अण्वस्रसज्ज असल्याने दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला गेल्यास अणुयुद्धाचा धोका संभवतो. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाल्यास किती जीवितहानी होऊ शकते, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2 / 9 सध्या जगभरात विविध देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. त्यामध्ये रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. तर चीन आणि तैवानमध्ये संघर्ष भडकण्याची चिन्हे आहेत, अशा परिस्थितीत अणुयुद्ध झाल्यास काही मिनिटांमध्ये कोट्यवधी लोकांचा मृत्यू होईल. 3 / 9 एका अध्ययनानुसार जर संपूर्ण जगामध्ये अणुयुद्ध भडकल्यास काही मिनिटांमध्येच कोट्यवधी लोक मारले जातील. तर त्यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हा अणुयुद्धानंतर पडणाऱ्या दुष्काळामुळे होईल.या अध्ययनानुसार अणुयुद्धोत्तर जगात सुमारे ५०० कोटी लोक हे अन्नपाण्यावाचून मृत्युमुखी पडतील. अणुयुद्धानंतर शेतातील धान्य, झाडे, वृक्ष, वेली सारे काही नष्ट होईल. पिण्याच्या पाण्याचे स्रोत रेडिएशनमुळे दूषित होईल. ते पिल्यास कॅन्सरसारखे गंभीर आजार होतील. 4 / 9 जर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्धास तोंड फुटल्यास ते केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाही. तर ते संपूर्ण जगात पसरू शकते. त्यामुळे होणाऱ्या संहाराची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. ज्या देशात अणुयुद्ध पोहोचणार नाही, अशा देशांनाही भयावह परिणामांचा सामना करावा लागेल. त्याची अंतिम परिणती मानवजातीच्या खात्म्यामध्येही होऊ शकते. 5 / 9 भारत आणि पाकिस्तानकडे अमेरिका आणि रशियाप्रमाणे प्रचंड अण्वस्रे नाहीत. मात्र शास्त्रज्ञांच्या मते दोन्ही देशांत अणुयुद्ध सुरू झाल्यास दोन्ही देश किमान १०० अण्वस्रांचा वापर करतील. त्यातील प्रत्येक अण्वस्रातून सरासरी १५ किलोटन उर्जा उत्सर्जित होईल. 6 / 9 भारत आणि पाकिस्तानमध्ये भडकणाऱ्या संभाव्य अणुयुद्धातून उत्सर्जित होणाऱ्या उर्जेमुळे तत्काळ सुमारे पावणे तीन कोटी लोकांचा मृत्यू होईल. तसेच या अणुयुद्धामुळे सुमारे ५ मेगाटन राख निर्माण होईल. त्याबरोबरच पुढील दोन वर्षांमध्ये अन्नधान्याच्या टंचाईमुळे २५.५ कोटी लोकांचा मृत्यू होईल. 7 / 9 हे अध्ययन रटगर्स विद्यापीठाचे प्राध्यापक एलन रोबोक यांनी केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्धाचा परिणाम केवळ या दोन देशांवरच नाही, तर इतर शेजारी देशांवरही पडेल. 8 / 9 शास्त्रज्ञांनी केलेल्या गणनेनुसार जर अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध भडकल्यास सध्याच्या हत्यांरांनुसार सुमारे १५ कोटी टन राख वायूमंडळात जाईल. त्यामुळे प्रत्येक देशावर काळे दाट ढग दाटतील. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अमेरिकेतील काही देश यापासून बचावू शकतात. 9 / 9 अणुयुद्धानंतर संपूर्ण जगामध्ये आण्विक थंडी पसरेल. हा काळ सुमारे ४० वर्षांचा असेल. कारण अणुबॉम्बच्या स्फोटांमुळे निर्माण होणारी राख हवेच्या वरच्या थरात जाऊन अंधार निर्माण करतील. त्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचेल. अन्नाची टंचाई होईल. समुद्री मत्सजीवनावरही विपरीत परिणाम होईल. आणखी वाचा