चालता-फिरता, नाचता-गाता अचानक होतायेत आकस्मिक मृत्यू; कोरोना तर कारण नाही? By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:16 AM
1 / 11 चालता-फिरता चक्कर येऊन कुठेतरी अचानक मृत्यू होतो तर कुठे नाचता-गाता एखाद्याचा जीव जातो. कधी अभिनय करताना कलाकारांचा अचानक मृत्यू होतो तर कधी जिममध्ये व्यायाम करताना किंवा मैदानात खेळताना मृत्यू होतो या बातम्या तुम्ही सध्या खूप वाचत असाल. 2 / 11 सोशल मीडियाच्या जमान्यात अशा घटनांचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. शेवटी, कार्डिअॅक अरेस्टच्या घटना अचानक का वाढत आहेत? त्याचा कोरोनाशी काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत असून त्याबाबत विविध प्रकारच्या अफवाही पसरवल्या जात आहेत. 3 / 11 आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. कार्डिअॅक अरेस्टच्या घटनांमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण शोधण्यासाठी आणि त्याचा कोरोनाशी काही संबंध आहे का हे शोधण्यासाठी ICMR ने अभ्यास सुरू केला आहे. 4 / 11 देशभरातील आकस्मिक मृत्यूच्या वाढत्या घटनांनी तज्ज्ञही चिंतेत आहेत. त्यासाठी वर्बल शवविच्छेदन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये कोणती लक्षणे दिसली, त्याचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याआधी त्याला काही समस्या होत्या का इत्यादी माहिती संकलित केली जाते. 5 / 11 सूत्रांनी TOI ला सांगितले की, ICMR ने या अभ्यासात काही टॉप कार्डिओलॉजिस्ट आणि AIIMS च्या फॉरेन्सिक तज्ञांना देखील सामील केले आहे. 'आकस्मिक मृत्यूंमागील संभाव्य कारण काय आहे याबद्दल सर्व प्रकारची खोटी माहिती पसरवली जात आहे असं आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 6 / 11 त्याचसोबत अनेक लोक याचा संबंध कोरोना आणि त्याच्या लसीशीही जोडत आहेत. अशा घटनांमागील खरे कारण शोधणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अलीकडे, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये लोक चालताना किंवा डान्स करताना किंवा जिममध्ये वर्कआउट करताना अचानक खाली पडतात आणि मरतात. 7 / 11 विशेष म्हणजे यातील बहुतांश तरुण आहेत. एका हृदयरोग तज्ञाने सांगितले की, 'लोकांनी हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, त्यांचे वय, फिटनेस काहीही असो. वेळोवेळी आरोग्य तपासणीही करावी असा सल्ला त्यांनी लोकांना दिला. 8 / 11 तज्ज्ञांनी आता आकस्मिक मृत्यू झाल्यास पोस्टमार्टम करण्याचीही सूचना केली आहे. जर मृत व्यक्ती तरुण असेल आणि त्याला हृदयविकार नसेल तर अशा प्रकरणात पोस्टमॉर्टम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे मृत्यूचे खरे कारण शोधण्यात मदत होईल असं तज्ज्ञांनी सांगितले. 9 / 11 जर पोस्टमॉर्टेममध्ये मृत्यूचे कारण हृदयाशी संबंधित आजार असेल, ज्याची मृत व्यक्तीला पूर्वी माहिती नव्हती, तर त्यांच्या कुटुंबियांनाही हृदयविकार तर नाही ना याचीही चौकशी करता येईल. हृदयाशी संबंधित काही आजार असे असतात की, कुटुंबातील कोणाला ते असल्यास, इतर सदस्यांनाही ते होण्याची शक्यता असते असं तज्ज्ञ म्हणाले. 10 / 11 हृदयविकाराचा झटका आणि कार्डिअॅक अरेस्ट यात फरक आहे. हृदयाला जाणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, हृदयविकाराचा झटका ही एक 'अभिसरण' समस्या आहे. 11 / 11 पण दुसरीकडे, कार्डिअॅक अरेस्ट ही 'इलेक्ट्रिकल' समस्या आहे. हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा कार्डिअॅक अरेस्ट अधिक घातक आहे कारण हृदयाचे ठोके अचानक थांबतात किंवा खूप अनियमित होतात असं अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटलं आहे. आणखी वाचा