शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही ५ आव्हानं पार न केल्यास भाजपासमोरील अडचणी वाढणार, पोटनिवडणुकीतील पराभवाने दिले स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 4:35 PM

1 / 6
केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ७ राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचा निकाल भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या १३ जागांपैकी केवळ २ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीतील पराभवाने भाजपाला काही स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच भाजपासमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. त्यामधील खालील ५ प्रमुख आव्हानांवर योग्य तोडगा न काढल्यास भाजपासमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत.
2 / 6
केंद्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरही लोकांना फार काही बदल झाल्याचं दिसत नाही आहे. त्यामुळे सरकारबाबत सामान्य लोकच सोडा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साहही मावळत चालला आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून उभ्या करण्यात येत असलेल्या नरेटिव्हचा सामना करण्यात भाजपाला अपयश येत आहे. काहीच बदल झाला नाही, असं जनतेला वाटत आहे. हे चित्र असंच राहिलं तर पुढच्या काही काळात जनतेमध्ये परिवर्तनाची लाट येऊ शकते. तसेच भाजपासमोरील आव्हान वाढू शकते.
3 / 6
लोकसभा निवडणुकीनंतर आता या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र या राज्यातील सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहता तिन्ही राज्यांमध्ये विजय मिळवणं भाजपासाठी अवघड दिसत आहे. हरियाणामध्ये भाजपानं जेजेपीच्या पाठिंब्यासह पाच वर्षं सरकार चालवलं होतं. मात्र आता ही आघाडी तुटली आहे. महाराष्ट्रात भाजपा महायुतीच्या माध्यमातून सत्तेवर असला तरी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचा पराभव झाला आहे. तर झारखंडमध्येही लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणाची सत्ता राखणं आणि झारखंडमध्ये सत्तेवर येणं भाजपासाठी आव्हानात्मक दिसत आहे.
4 / 6
२०२५ च्या सुरुवातील दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र दिल्लीतील मतदारांचा मागच्या काही वर्षांतील राजकीय कल पाहता येथे आम आदमी पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत येथे भाजपाने ७ पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. मात्र त्या निकालाची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अजूनही तुरुंगात आहेत. त्यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला सहानुभूती मिळू शकते. तर २०१५ च्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथे भाजपाची मदार ही नितीश कुमार आणि इतर पक्षांकडून मिळणाऱ्या साथीवर असेल.
5 / 6
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यापासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बदलं जाण्याची चर्चा उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता लोकसभेच्या निकालांनंतर ही चर्चा अधिकच वाढली आहे. त्यामुळे पुढच्या काळात योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहतील की नाही, याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची जबरदस्त पीछेहाट झाली असताना योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाबाबत निर्माण झालेला संभ्रम हा भाजपासाठी अडचणीचा ठरू शकतो.
6 / 6
मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. भाजपाची धोरणं ही शेतकरी विरोधी असल्याचं मत शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवण्यात विरोधी पक्षांना यश आलं आहे. एकीकडे शेतकरी वर्ग नाराज असतानाच जवानांच्या मुद्द्यावरूनही भाजपा सध्या बॅकफूटवर आहे. अग्निवीरसारख्या योजनेवरून काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी भाजपाला बॅकफूटवर आणले आहे. या दोन मुद्द्यांवर पुढच्या काही काळात तोडगा न निघाल्यास भाजपा आणखी अडचणीत येऊ शकतो.
टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथ