शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनच्या सीमेवर फायटर जेट, हेलिकॉप्टर अन् ड्रोन पाठवतोय भारत; ४८ तासांत मोठ्या युद्धसरावाची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:56 PM

1 / 8
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये चीनच्या सैनिकांसोबतच्या झटापटीच्या घटनेनंतर आता भारतीय लष्कर आणि हवाई दल अलर्ट मोडवर आहे. भारतीय हवाई दल येत्या ४८ तासांत चीनी सीमेला खेटून असलेल्या चार एअरबेसवर युद्धाभ्यास करण्याची तयारी करत आहे. यात हवाई दलातील लढाऊ विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा समावेश असणार आहे. हवाई दलाच्या पूर्व कमांडकडून याची तयारी केली जात आहे.
2 / 8
समोर आलेल्या माहितीनुसार १५ आणि १६ डिसेंबर रोजी चीनी सीमेजवळ युद्ध सराव होणार आहे. हवाई दलाच्या ज्या चार एअरबेसवर सराव होणार आहे त्यात तेजपूर, चाबुआ, जोरहट आणि हाशिमारा यांचा समावेश आहे.
3 / 8
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये यांगत्सेजवळ ९ डिसेंबरला भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या तणावाच्या परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या या युद्धाभ्यासाला या घटनेशी जोडलं जात आहे. पण ही एक नियमीत कवायतीचा भाग असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे आणि याची तारीख याआधीच निश्चित करण्यात आली होती. याचा सध्या घडलेल्या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा हवाई दलानं केला आहे.
4 / 8
हवाई दलाच्या या युद्धाभ्यासाचं लक्ष्य पूर्व भागातील आपल्या ऑपरेशन्स आणि क्षमतेची जाणून घेणं असल्याचं म्हटलं जात आहे. पूर्वोत्तर सीमेशी खेटून असलेल्या चीन, बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमांची देखरेखीची जबाबदारी पूर्व कमांडकडे आहे.
5 / 8
अरुणाचलमधील तवांग येथे यांगत्से भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये ९ डिसेंबर रोजी झटापट झाल्याची माहिती भारतीय लष्करानं निवेदनातून दिली होती. या झटपटीत दोन्ही बाजूच्या सैनिकांना जबर दुखापत झाली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, भारतीय जवानांनी मोठ्या हिमतीनं चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यापासून रोखलं आणि माघारी धाडलं. चीनच्या झटापटीला तात्काळ प्रत्युत्तर देत त्यांना मागे हटण्यासाठी भारतीय सैनिकांनी भाग पाडलं. यात एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही. तसंच कुणीही गंभीर जखमी झालेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
6 / 8
याआधी गलवान खोऱ्यात चीन आणि भारताचे सैनिक भिडले होते. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर या घटनेच्या ६ महिन्यांनंतर चीननं त्यांचे ४ जवान मारले गेल्याचं कबुल केलं होतं. पण ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्रानं केलेल्या खुलश्यानुसार गलवान खोऱ्यातील झटापटीत चीनचे कमीत कमी ३८ जवान मारले गेल्याचं म्हटलं होतं.
7 / 8
अरुणाचलमध्ये एलएसी जवळ तवांग येथे झालेल्या झटापटीच्या घटनेत अमेरिकेनं भारताला साथ दिली आहे. पेंटागॉन प्रेस सचिव पॅट रायडर यांनी म्हटलं की चीन इंडो-पॅसिफीक भागात अमेरिकेचे साथीदार आणि भागीदार देशांना जाणूनबुजून उकसवण्याचं काम करत आहे. आम्ही आमच्या साथीदार देशांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहोत, असंही अमेरिकन सचिवांनी नमूद केलं आहे.
8 / 8
अमेरिकेचा संरक्षण विभाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अमेरिकेनं एलएसीजवळ चीनकडून सैन्य नियुक्ती आणि बांधकामाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. पेंटागॉन प्रेस सचिव पॅट रायडर म्हणाले, आम्ही आमच्या सहयोगी आणि साथीदार देशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत. तसंच भारताकडून तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांचं आम्ही समर्थन करतो.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलindia china faceoffभारत-चीन तणाव