India might see 2 87 lakh Covid cases per day by February 2021 MIT study reveals
CoronaVirus News: चिंताजनक! ...तर भारतात दररोज कोरोनाचे २.८७ लाख रुग्ण सापडणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 11:18 AM1 / 10गेल्या २४ तासांत देशात २२ हजार ७५२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ७ लाख ४२ हजार ४१७ वर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून भारतात दर दिवशी कोरोनाचे २० ते २२ हजार रुग्ण आढळून येत आहेत.2 / 10कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अतिशय चांगलं असलं तरी कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढणारी संख्या देशाच्या दृष्टीनं चिंताजनक आहे. अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांना उपचारांसाठी बेड्स मिळत नसल्याचं समोर आलं आहे. 3 / 10कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं आधीच देशातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच कोरोनावरील लस अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोरोनाचं संकट आणखी वाढणार आहे. मॅसाच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (एमआयटी) या संदर्भात दिलेली आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे.4 / 10पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कोरोनावरील लस न सापडल्यास फेब्रुवारीपासून भारतात दर दिवशी २.८७ लाख रुग्ण सापडतील, अशी शक्यता एमआयटीकडून वर्तवण्यात आली आहे. एमआयटीमधील संशोधकांनी ८४ देशांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन महत्त्वाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.5 / 10जगातील ८४ देशांमधील कोरोना रुग्णसंख्या, तिथे होणाऱ्या चाचण्या यांचा अभ्यास एमआयटीमधील संशोधकांनी केला आहे. या ८४ देशांमध्ये जगातील ६० टक्के लोकसंख्या राहते.6 / 10एमआयटीच्या स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील संशोधक हाझहिर रहमानदाद, टी. वाय. लिम आणि जॉन स्टेरमन यांनी सेर पद्धतीचा वापर करून कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली. जगभरातील संसर्गतज्ज्ञांकडून विश्लेषणाकडून सेर पद्धतीचा वापर केला जातो.7 / 10कोरोनावरील उपचार न सापडल्यास पुढील वर्षीच्या मार्च-मे महिन्यांदरम्यान जगभरातील रुग्णांची संख्या २० ते ६० कोटींच्या घरात असेल, असा अंदाज एमआयटीच्या संशोधकांनी वर्तवला आहे.8 / 10फेब्रुवारीत भारतात दर दिवशी कोरोनाचे २.८७ लाख रुग्ण आढळून येतील, असा एमआयटीच्या संशोधकांचा अंदाज आहे. त्यानंतर अमेरिका (प्रति दिवशी ९५ हजार रुग्ण), दक्षिण आफ्रिका (प्रति दिवशी २१ हजार रुग्ण) आणि इराण (प्रति दिवशी १७ हजार रुग्ण) यांचा क्रमांक असेल.9 / 10एमआयटीच्या संशोधकांनी आकडेवारी प्रसिद्ध करताना तीन गोष्टी विचारात घेतल्या आहेत. १. सध्याचं चाचण्यांचं प्रमाण आणि त्याचे निष्कर्ष. २. सध्याची चाचण्यांची क्षमता १ जुलै २०२० पासून दररोज ०.१ टक्क्यांनी वाढल्यास, ३. चाचण्यांचं प्रमाण न वाढल्यास, पण संसर्ग वाढल्यास (एका व्यक्तीमुळे आठ जणांना संसर्ग झाल्यास) काय होईल, या मुद्द्यांचा विचार संशोधकांकडून करण्यात आला आहे.10 / 10कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या होणं गरजेचं असल्याचं सेर पद्धत सांगते. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणं आवश्यक आहे. चाचण्यांची संख्या जितकी कमी, तितका कोरोनाचा धोका अधिक असल्याचं एमआयटीच्या संशोधकांनी म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications