शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताचा एक निर्णय ठरला पाकिस्तानसाठी वरदान; परदेशी चलनांमध्ये वाढ, कसं? ते वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 1:45 PM

1 / 10
भारत सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीत पाकिस्तानसाठी ही बंदी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. भारताच्या या निर्णयानंतर जागतिक बाजार पाकिस्तानकडे वळू लागले.
2 / 10
आगामी सणासुदीच्या हंगामात देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किरकोळ किमती नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने जुलै २०२३ मध्ये गैर-बासमती तांदळाच्या विक्रीवर बंदी घातली होती. या निर्णयामुळे पाकिस्तानची चांदी झाली.
3 / 10
गरीब पाकिस्तानातील लोकांची गरिबीची अवस्था तशीच आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वीज आणि पेट्रोलचे दर भडकले आहेत. लोकांना खायला पीठही मिळत नाही.
4 / 10
यात भारत सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे पाकची स्थिती बदलणार आहे. अत्यंत बिकट अवस्थेत असलेल्या पाकिस्तानसाठी भारत सरकारचा एक निर्णय वरदान ठरत आहे. जाणून घ्या कसं?
5 / 10
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारताच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत तांदळाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे बिकट अवस्थेतील पाकिस्तानातून तांदळाची मागणी वाढली.
6 / 10
अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची तांदूळ निर्यात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी जास्त असेल असा अंदाज USDA ने व्यक्त केला आहे.
7 / 10
यातून पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. हे प्रमाण ४८ लाख टन असेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पाकिस्तानसाठीही हे महत्त्वाचे आहे कारण पाकिस्तानमध्ये गहू आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे.
8 / 10
पाकिस्तानचे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. भारताच्या निर्णयानं पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानची परकीय चलनाची तिजोरी जवळपास रिकामी आहे.
9 / 10
पाकिस्तान जगातील चौथा सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. तांदूळ निर्यातीत भारत पहिल्या स्थानावर आहे. २०२२-२३ मध्ये तांदळाच्या एकूण जागतिक निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के होता. या वर्षी पाकिस्तानचे एकूण तांदूळ उत्पादन ९० लाख टन होण्याचा अंदाज आहे. तर गेल्या वर्षी पाकिस्तानचे एकूण तांदूळ उत्पादन केवळ ५५ लाख टन होते.
10 / 10
रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे तांदूळ निर्यात वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे भारताने तांदूळ निर्यातीवर घातलेली बंदी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानने रशिया आणि मेक्सिकोलाही तांदूळ निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्याच वेळी, पाक इंडोनेशियाला पूर्वीपेक्षा अधिक निर्यात करत आहे.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान