शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India vs China Conflict: अरुणाचल प्रदेशात भारताचा चीनसोबत नेमका वाद काय आहे? जाणून घ्या संपूर्ण इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 2:11 PM

1 / 12
India vs China Conflict: अरुणाचल प्रदेशातील LAC (वास्तविक नियंत्रण रेषे) जवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा हिंसक झडप झाली आहे. चीनने अशाप्रकारचे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. एका वर्षापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये देखील चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 क्षेत्रांची नावे बदलली होती. तेव्हाही भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. आता प्रश्न पडतो की, चीन नेहमी अरुणाचल प्रदेशात आपला दावा का करतो? नेमका काय आहे हा सीमावाद ?
2 / 12
वास्तविक सीमा नियंत्रण (LAC) वरील यांगत्से भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर चीनसोबतचा भारताचा सीमावाद पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैन्याची चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 9 डिसेंबर रोजी 300 हून अधिक चिनी सैनिकांनी 17 हजार फूट उंचीवर असलेल्या भारतीय शिखराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे सर्व मनसुबे हाणून पाडले.
3 / 12
अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे सांगत चीन आपला दावा मांडत आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावे गेल्या वर्षीच बदलली होती. यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि काम राहील. एप्रिल 2017 मध्येही चीनने अशाप्रकारे नावे बदलण्याचा प्रयत्न केला होता.
4 / 12
अरुणाचल प्रदेशाबाबत भारत आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. भारताची चीनशी जवळपास 3500 किलोमीटरची सीमा आहे. याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC म्हणतात. अरुणाचल प्रदेशचे दक्षिणेकडील तिबेट असे वर्णन करून चीन हा आपला भूभाग असल्याचा दावा करतो. 1950 मध्ये चीनने तिबेटवर हल्ला करून त्यावर कब्जा केला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन अरुणाचल प्रदेशच्या सुमारे 90 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर दावा करतो.
5 / 12
चीनसोबतची सीमा वाटणी तीन भागात विभागली गेली आहे. पूर्व, मध्य आणि पश्चिम. पूर्वेकडील सेक्टरमध्ये अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमची सीमा आहे. त्याची लांबी 1346 किमी आहे. उत्तराखंड आणि हिमाचलच्या मध्यभागी चीन आणि पश्चिम सेक्टरमध्ये लडाखची सीमा आहे. मॅकमोहन रेषा ही चीन आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा मानली जाते.
6 / 12
आंतरराष्ट्रीय नकाशातही अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग मानला जातो. पण चीनने याचा इन्कार केला आणि दावा केला की, अरुणाचल प्रदेश, तिबेटचा दक्षिण भाग (जो सध्या चीनचा भाग आहे) भारताच्या ताब्यात आहे. तवांग मठ अरुणाचल प्रदेशात आहे, जिथे सहावे दलाई लामा यांचा जन्म 1683 मध्ये झाला होता.
7 / 12
1912 पर्यंत भारत आणि तिबेटमध्ये सीमारेषा नव्हती. कारण हा परिसर ना इंग्रजांच्या अखत्यारीत होता ना मुघलांच्या. पण 1914 मध्ये अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध बौद्ध स्थळ तवांग मठाचा शोध लागल्यानंतर सीमारेषा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 1914 मध्ये शिमला कराराअंतर्गत तिबेट, चीन आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सीमा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
8 / 12
शिमला करारातही चीनने तिबेटला स्वतंत्र देश मानले नाही. दुसरीकडे, एक कमकुवत राष्ट्र पाहून ब्रिटिशांनी दक्षिण तिबेट आणि तवांग भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण तिबेट आणि तवांग भारतात विलीन झाल्यामुळे संतप्त झालेल्या चीनने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तेथील नागरिकांनी ते मान्य केले, पुढे 1950 मध्ये चीनने तिबेटवर हल्ला करून ते स्वतःमध्ये विलीन केले. तिबेटमध्ये बौद्ध धर्मावर विश्वास ठेवणारे लोक जास्त होते.
9 / 12
त्यामुळे बौद्धांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण असलेल्या तवांगवर आपला अधिकार असावा, अशी चीनची इच्छा होती. त्यामुळेच अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे चीन वारंवार सांगत आहे. डिसेंबर 2021 मध्ये चीनी कम्युनिस्ट पक्षाचा मुखवटा मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्सने एका अहवालात म्हटले की, चीन सरकारने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची चिनी, तिबेटी आणि रोमन नावे जारी केली आहेत.
10 / 12
रिपोर्ट्समध्ये ग्लोबल टाइम्सने दावा केला होता की, चीनने जंगनान (अरुणाचल प्रदेशचे चिनी नाव) येथील निवासी ठिकाणे, नद्या आणि पर्वतांसह 15 क्षेत्रांची नावे बदलली आहेत. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, अरुणाचल प्रदेशचे नाव बदलण्याचा चीनने प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले होते की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. नवीन नावे ठेवल्याने वस्तुस्थिती बदलत नाही.
11 / 12
अरुणाचल प्रदेशावर आपला दावा मजबूत करण्यासाठी चीन वेळोवेळी भारतीय नेत्यांच्या अरुणाचल भेटीला विरोध करत असतो. चीनच्या या आक्षेपावर भारत नेहमीच अरुणाचल प्रदेश भारतातील इतर राज्यांप्रमाणेच असल्याचे सांगत आला आहे. म्हणूनच भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे कुठेही तर्कसंगत नाही.
12 / 12
ऑक्टोबर 2021 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिली. त्यावर चीनचा आक्षेप होता की, भारताने असे कोणतेही काम करू नये, ज्यामुळे सीमावाद आणखी वाढेल. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनने विरोध केला होता.
टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतchinaचीन