शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ramayana Circuit Train: अत्याधुनिक सुविधा, लायब्ररी, डायनिंग कारसह करा ‘श्री रामायण यात्रा’; IRCTC च्या नव्या ट्रेनची झलक पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 4:26 PM

1 / 9
IRCTC ने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी श्री रामायण यात्रेची योजना आखली असून, रविवार, ०७ नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरू करण्यात येत आहे. दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून प्रवास सुरू होईल आणि प्रभू रामाच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणे या यात्रेदरम्यान दाखवली जाणार आहेत.
2 / 9
तुम्हालाही श्री रामायण यात्रेअंतर्गत धार्मिक सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या ट्रेनचा पहिला थांबा अयोध्या असेल, जिथे यात्रेकरू नंदीग्राममधील भारत मंदिराशिवाय श्री रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिराला भेट देतील.
3 / 9
यानंतर बिहारमधील सीतामढीला रवाना होतील. याशिवाय, जनकपूर येथील राम जानकी मंदिराला सुद्धा भेट देता येणार आहे. यानंतर यात्रेकरू वाराणसीला रवाना होतील. वाराणसीहून प्रवासी प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटला फिरायला जातील.
4 / 9
यानंतर नाशिकला नेण्यात येईल. याठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पंचवटीला भेट देतील. यानंतर यात्रेकरू हंपीला रवाना होतील, हंपीमध्येच किष्किंधा हे प्राचीन शहर होते. यानंतर प्रवासी या दौऱ्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या रामेश्वरमला रवाना होतील.
5 / 9
IRCTC ने देखो अपना देश कार्यक्रमांतर्गत श्री रामायण यात्रा सुरू केली आहे. श्री रामायण यात्रेसाठी स्वतंत्र भाडे निश्चित करण्यात आले आहे. या प्रवासाअंतर्गत सेकंड एसी क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती ८२ हजार ९५० रुपये आकारले जातील. तर, फर्स्ट एसीमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती १ लाख ०२ हजार ०९५ रुपये आकारले जातील.
6 / 9
या प्रवासादरम्यान यात्रेकरूंना एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय, जेवण, प्रेक्षणीय स्थळांसाठी एसी वाहने आणि प्रवाशांचा प्रवास विमा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, प्रवासादरम्यान प्रवाशांच्या आरोग्यविषयक सेवा आणि सुविधांचीही पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. तसेच या यात्रेसाठी १८ वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील प्रत्येक प्रवाशाचे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
7 / 9
या यात्रेसाठी IRCTC कडून तयार करण्यात आलेल्या विशेष ट्रेनमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एलएचबी तंत्रज्ञानावर आधारित डब्यांसह पूर्णपणे वातानुकुलित ही ट्रेन असणार आहे. या श्री रामायण यात्रेच्या बुकिंगसाठी irctctourism.com या संकेतस्थळाला आपण भेट देऊ शकता.
8 / 9
IRCTC च्या या विशेष ट्रेनमध्ये प्रवाशांना आधुनिक किचर कारसह डायनिंग रेस्तरॉं, फुट मसाजर, मिनी लायब्ररी, आधुनिक सुविधांनी युक्त शौचायले आणि शॉवर क्युबिकल अशा उत्तमोत्तम सुविधा देण्यात येणार आहेत. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टिने एक गार्ड, इलेक्ट्रिक लॉकर आणि सीसीटीव्ही कॅमेरा या सोयीही देण्यात येत आहेत.
9 / 9
या संपूर्ण प्रवासादरम्यान IRCTC ची संपूर्ण टीम स्वच्छतेची विशेष काळजी घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आरोग्यासंदर्भातील सर्व प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांना फेस मास्क, हँड ग्लोव्ज आणि सॅनिटायझर आदींचा समावेश असलेले एक सुरक्षा किटही देण्यात येणार आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुरक्षित, आरामदायी प्रवास देण्याचा प्रयत्न IRCTC करणार आहे.
टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीramayanरामायणIndian Railwayभारतीय रेल्वे