शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भटक्या जमातीचं आयुष्य बदललं! आता 'पद्मश्री'ने सन्मान; ४० वर्ष संघर्ष अन् अनवाणी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 4:51 PM

1 / 10
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी अर्थात गुरूवारी यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या शिलेदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. छत्तीसगडमधील तीन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. जगेश्वर यादव, रामलाल सेठ आणि हेमचंद मांझी अशी पुरस्कार विजेत्यांची नावे आहेत.
2 / 10
जगेश्वर यादव यांनी आयुष्यभर गोर गरिबांसाठी काम केले. आदिवासींसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या उन्नतीसाठी समर्पित केले. स्थानिक लोक त्यांना 'बिरहोरचा भाऊ' असे संबोधतात.
3 / 10
खरं तर राज्यात केवळ ३ हजार लोकसंख्या असलेल्या बिरहोर जमातीच्या उन्नतीसाठी एका व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य अनवाणी पायाने घालवले. जगेश्वर यांच्या मागील ४० वर्षांच्या अथक परिश्रमाचे फळ त्यांना मिळत आहे. कारण त्यांच्या या कामाची दखल सरकारने घेतली असून त्यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
4 / 10
छत्तीसगडमधील जशपूर येथील बिरहोर जमातीचे लोक ४० वर्षांपूर्वी आदी मानवासारखे जीवन जगायचे. या जमातीचे लोक घनदाट जंगलात कपड्यांशिवाय झोपडीत राहायचे आणि वन्य प्राण्यांची शिकार करून आणि जंगलातील फळे खाऊन आपला उदरनिर्वाह करत.
5 / 10
अज्ञानामुळे या जमातीतील अनेक लोक मेलेल्या वन्य प्राण्यांचे मांस खाऊन मृत्युमुखी पडले. समाजाची ही अवस्था पाहून शेजारील गावात राहणारे जगेश्वर मदतीला सरसावले. त्यांनी या भटक्या जमातीच्या उन्नतीसाठी पुढाकार घेतला.
6 / 10
दरम्यान, बिरहोर जमातीचे लोक त्यांच्या समाजाच्या बाहेरील लोकांपासून दूर राहत असत आणि त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास त्यांना आवडत नसत. त्यांना कोणी भेटण्याचा प्रयत्न केला तरी ही लोक घाबरून जंगलात लपून बसायचे, पण अशा परिस्थितीतही जगेश्वर यादव यांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला अन् त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.
7 / 10
बिरहोर जमातीला विशेष संरक्षित जमातीचा दर्जा मिळेपर्यंत लग्न करणार नाही, अशी शपथही जगेश्वर यांनी घेतली होती. खूप प्रयत्नांनंतर या जमातीला विशेष संरक्षित जमातीचा दर्जा मिळाला आणि त्यांच्या उन्नतीसाठी प्रशासकीय मदत मिळू लागली. जगेश्वर मागील अनेक वर्षांपासून या जमातीतील लोकांची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.
8 / 10
हळू हळू या समाजाचे अज्ञान दूर होत चालले आहे. ते आता जंगलात राहत नसून जंगलाच्या काठावर राहतात. पण, कधीकाळी वन्य प्राण्यांचे मांस खाणाऱ्या या समाजाने प्राण्यांची शिकार करणे बंद केले आहे. आता ते शेती, पशुपालन करतात आणि सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगतात.
9 / 10
या जमातीचा मुख्य व्यवसाय दोरी बनवणे आणि विकणे हा आहे आणि उदरनिर्वाहाचे मुख्य साधन देखील हेच आहे. जगेश्वर यादव यांच्या पुढाकाराने या गावात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा सुविधाही उपलब्ध आहेत.
10 / 10
जगेश्वर यांनी ज्ञानाच्या मार्गावर आणल्यामुळे ही जमाती त्यांना देव मानते. बिरहोर जमातीच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या जगेश्वर यांना २०१५ मध्ये छत्तीसगड सरकारने शहीद वीरनारायण सिंह पुरस्कारानेही सन्मानित केले होते. बिरहोरांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर त्यांनी अनवाणी राहण्याचा संकल्प केला होता, जो ते आजतागायत पाळत आहेत.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी