शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसचे ते ‘चार चाणक्य’ कोण? ज्यांनी पडद्यामागून पालटली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 1:11 PM

1 / 10
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेसनं बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे. दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळला आहे.
2 / 10
काँग्रेसच्या या मोठ्या विजयात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्याशिवाय अनेक चेहरे पडद्याआडून सक्रिय होते. कर्नाटकात काँग्रेसची बाजू भक्कम करणारे ते चार चाणक्य कोण आहेत ते जाणून घेऊया.
3 / 10
एमबी पाटील - कर्नाटक काँग्रेसमधील लिंगायत समाजाच्या चेहऱ्यांमध्ये एमबी पाटील यांची गणना होते. काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीमागे एम.बी.पाटील यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं मानलं जातंय. एम.बी.पाटील हे काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत. यावेळी काँग्रेसनं स्थानिक प्रश्नांवर तसंच घरोघरी प्रचारावर अधिक भर दिला. यामागेही पाटीलच असल्याचं म्हटलं जातंय.
4 / 10
यामुळेच चार वर्षांनी सोनिया गांधींनी निवडणूक रॅली काढली. कुमारस्वामी सरकारमध्ये पाच वेळा आमदार आणि गृहमंत्री राहिलेले एम.बी. पाटील यांनाही मिशन शेट्टर सोपवण्यात आलं होतं. जगदीश शेट्टर यांना काँग्रेसमध्ये आणण्यामागे त्यांचं योगदान असल्याचं मानलं जातं. सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एमबी पाटील यांचे वडील बीएम पाटील हेही दिग्गज राजकारणी होते.
5 / 10
शशिकांत सेंथिल - काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी शशिकांत सेंथिल हे आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. २००९ मध्ये कर्नाटक केडरचे आयएएस सेंथिल कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस वॉररूमचे प्रभारी होते. २०१९ मध्ये, त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि २०२० मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. जुलै २०२२ मध्ये त्यांना वॉररूमची जबाबदारी देण्यात आली. वॉररूममधून निवडणुकीदरम्यान प्रत्येक जागेचे मूल्यांकन करून बड्या नेत्यांना अहवाल पाठवण्यात आला.
6 / 10
तथ्य तपासण्यासोबतच सेंथिल यांच्या नेतृत्वाखाली एक संपूर्ण टीम भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर पलटवार करण्यासाठी वॉररूममध्ये काम करत होती. सेंथिल हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. भाजप कर्नाटकात हिंदुत्वाच्या नावावर फूट पाडण्याचे राजकारण करत आहे, त्यामुळे आपण आयएएसच्या नोकरीचा राजीनामा दिल्याचं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना सांगितलं.
7 / 10
सुनील कानुगोलू - सुनील कानुगोलू हे डेटा ॲनालिसिसचे तज्ज्ञ मानले जातात. कानुगोलू हे २०२२ पासून कर्नाटक काँग्रेसच्या रणनीतीकारांपैकी एक आहेत. कानुगोलू यांनी प्रचार, सर्वेक्षण आणि उमेदवारांची निवड यासाठी रणनीती तयार केली. कर्नाटकातील बेल्लारी येथील रहिवासी असलेल्या कानुगोलू यांनी अमेरिकेतून एमबीएचे शिक्षण घेतलं आहे. २००९ मध्ये ते भारतात परतले. ते प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये (सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स) सामील झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते नरेंद्र मोदींच्या प्रचाराशी संबंधित टीमचा एक भाग होते. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपची रणनीती बनवण्यात कानुगोलू यांचाही मोठा वाटा होता.
8 / 10
त्यांनी २०२२ मध्ये अकाली दलसाठीही काम केलं. दुसरीकडे, कर्नाटकसाठी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्यानं काँग्रेसने कानुगोलू यांच्याशी संपर्क साधला. राज्यातील ४० वाल्या सरकारमध्ये टक्के सरकार, पे-सीएम आणि रेट कार्डसारख्या मोहिमांमागे कानुगोलूच असल्याचं म्हटलं जातं. जाहीरनाम्यातही त्यांची मदत घेण्यात आली होती. काँग्रेसनं त्यांना मध्य प्रदेशची जबाबदारीही दिली आहे. यासोबतच ते लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या काँग्रेसच्या २०२४ टास्क फोर्सचे सदस्य आहेत.
9 / 10
जी परमेश्वर - कर्नाटकमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यासाठी जी परमेश्वर यांचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जातं. या जाहीरनाम्यातील पाच हमींवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र, पीएफआयसह बजरंग दलावरील बंदीचा उल्लेख करून या जाहीरनाम्यामुळे काँग्रेसची काहीशी अडचण झाली. मात्र उर्वरित ६२ पानांचा जाहीरनामा काँग्रेसच्या बाजूनंच गेला. गृहज्योती योजनेंतर्गत दरमहा २०० युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपयांची हमी देण्यात आली होती. याशिवाय दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अन्न भाग्य यांच्यामार्फत दरमहा १० किलो तांदूळ हमी देण्यात आली होती.
10 / 10
दुसरीकडे, युवा निधी अंतर्गत बेरोजगार पदवीधरांना ३ हजार रुपये मासिक हमी देण्यात आली. तसेच, डिप्लोमाधारकांसाठी दोन वर्षांसाठी दरमहा १,५०० रुपये हमी समाविष्ट करण्यात आली होती. परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमनं कर्नाटकातील विविध प्रदेशांसाठी जाहीरनामे तयार केले. १९८९ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले परमेश्वर प्रसिद्धीपासून दूरच राहतात. २०१८ मध्ये जेव्हा काँग्रेस आणि जेडीएसचे युतीचे सरकार स्थापन झालं तेव्हा कुमारस्वामी मुख्यमंत्री आणि परमेश्वर उपमुख्यमंत्री बनले. सिद्धरामय्या सरकारमध्ये ते १९९९ मध्ये उच्च शिक्षण मंत्री आणि २०१५ मध्ये गृहमंत्रीही झाले.
टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा