शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Green Crackers: ग्रीन फटाके म्हणजे काय, ते खरंच प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 8:56 PM

1 / 9
विविध रंगांचा आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी म्हणजेच दीपावली साजरी केली जाते. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे रांगोळी, दिवाळी म्हणजे आकाशकंदील आणि दिवाळी म्हणजे फटाके.
2 / 9
संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडले जातात. विविध प्रकारचे आणि रोषणाई करणाऱ्या फटाक्यांमुळे दिवाळीची मजा आणखीनच वाढते. गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळीचा अर्थात इको फ्रेंडली दिवाळीचा आग्रह धरला जातो. (Green Crackers)
3 / 9
फटाक्यांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे साहजिकच फटाकेमुक्त दिवाळी या पर्यायाचा विचार केला जातो. याला पर्याय म्हणून ग्रीन फटाक्यांचा आग्रह धरण्यात येत आहे. ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होते, जे फटाके पर्यावरणपूरक आहेत, त्यांना ग्रीन क्रॅकर्स किंवा हरित फटाके असे म्हटले जाते. (Green Fatake)
4 / 9
हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यांप्रमाणे दिसतात. यामध्येही फुलबाजी, फ्लॉवरपॉट, स्काय शॉट असे प्रकार मिळतात. हे फटाके काडेपेटीच्या साह्याने उडवले जातात. याशिवाय या ग्रीन फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही असतात आणि वॉटर फटाके असतात. हे फटाके उडवण्याची पद्धत वेगळी असते.
5 / 9
ग्रीन फटाके वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात. या फटाक्यांमुळे प्रदूषण अजिबात होत नाही असे नाही; पण नेहमी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांपेक्षा सरासरी ३० ते ४० टक्के कमी होऊ शकते, असा दावा केला जातो. ग्रीन फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायने नसतात.
6 / 9
ग्रीन फटाक्यांमुळे वायू प्रदूषण कमी होते. या फटाक्यांमुळे रोषणाई होते. हे फटाके नेहमीच्या फटाक्यांसारखेच असतात; मात्र ते पर्यावरणपूरक असतात हे महत्त्वाचे. हे फटाके उडवताना धूर निघतो पण त्याचे प्रमाण अगदी कमी असते, असे सांगितले जात आहे.
7 / 9
गेल्या काही वर्षांपर्यंत काही ठरावीक संस्थाच या पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करत होत्या. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांचे उत्पादन होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारमान्य नोंदणी असणाऱ्या दुकानांमध्ये हे फटाके मिळू शकतील.
8 / 9
ग्रीन फटाके सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा थोडेसे महाग असतात. म्हणजे जे फटाके एरव्ही २५० रुपयांना मिळतात, त्याच प्रकारच्या ग्रीन फटाक्यांसाठी सुमारे ४०० रुपये खर्च करावे लागू शकतात.
9 / 9
आपल्याला दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करायची असेल, तर ग्रीन फटाक्यांचा पर्याय चांगला आहे. वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण न करणारे फटाके आपल्याला आणि मुख्य म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचा समतोल फार बिघडू देणार नाहीत. ग्रीन फटाके उडवून दिवाळीची नेहमीसारखी मजा लुटता येऊ शकेल.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2021