शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आघाड्यांचे युग ते संपूर्ण बहुमताचे सरकार, गेल्या 30 वर्षांत असे होते लोकसभेचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 2:13 PM

1 / 8
सध्या भारतात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असून, सतराव्या लोकसभेसाठी विविध राजकीय पक्षांमध्य रस्सीखेच सुरू आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेली लोकसभा विविध स्थित्यंतरामधून गेली आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
2 / 8
1991 - 1991 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तर एकूण 27 पक्षांचे खासदार निवडून लोकसभेत पोहोचले होते. या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते पी.व्ही. नरसिंहा राव यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती.
3 / 8
1996 - 1996 च्या लोकसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती उदभवली. यावेळी एकूण 30 पक्षांचे प्रतिनिधी लोकसभेत पोहोचले. या निवडणुकीनंतर भाजपा 161 जागांसह प्रथमच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार औटघटकेचे ठरले. त्यानंतर एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालील सरकारे स्थापन झाली. मात्र ती फार काळ टिकू शकली नाहीत.
4 / 8
1998 - लोकसभा भंग झाल्याने देशाला अवघ्या काही काळातच मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जावे लागले. या निवडणुकीतही 182 जागांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर एकूण 40 पक्षांच्या प्रतिनिधींना लोकसभेत स्थान मिळाले. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेले सरकारही मुदतीपूर्वीच पडले.
5 / 8
1999 - 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. यावेळी एकूण 41 पक्षांना लोकसभेत स्थान मिळाले. या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने रालोआ आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला.
6 / 8
2004 - सलग तीन निवडणुूकीत पराभूत झालेल्या काँग्रेसने 14 व्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितरीत्या विजय मिळवला. तर इंडिया शायनिंगचा नारा देणाऱ्या भाजपाला पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीनंतर एकूण 36 पक्षांचे प्रतिनिधी लोकसभेत पोहोचले. तर डाव्या पक्षांनी दिलेल्या बाहेरून पाठिंब्याच्या जोरावर काँग्रेसप्रणित यूपीए आघाडीने मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.
7 / 8
2009 - 2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 206 जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीमधून एकूण 38 पक्षांचे प्रतिनिधी लोकसभेत पोहोचले.
8 / 8
2014 - 2014 साली झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत 1984 नंतर प्रथमच देशात एकपक्षीय बहुमताचे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने 282 जागा मिळवल्या. तर काँग्रेसला केवळ 44 जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी एकूण 36 पक्षांना लोकसभेत स्थान मिळाले.
टॅग्स :lok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक