मोदी सरकार सर्वसामान्यांना देणार 'दिवाळी गिफ्ट'; मोठ्या घोषणेची तयारी सुरू By कुणाल गवाणकर | Published: October 22, 2020 8:18 AM
1 / 10 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प आले. या निर्णयाचे थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचं पाहायला मिळालं. 2 / 10 देश कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. मात्र अर्थव्यवस्था अद्यापही रुळावर आलेली नाही. लाखो लोकांचे रोजगार गेल्यानं, अनेकांचे पगार कापण्यात आल्यानं अनेकांनी खर्चावर लगाम घातला आहे. 3 / 10 लोक हातचं राखून खर्च करत असल्यानं वस्तूंना फारशी मागणी नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे मागणी वाढवण्याचे प्रयत्न सरकारनं सुरू केले आहेत. 4 / 10 केंद्र सरकारच्या ३० लाख कर्मचाऱ्यांसाठी काल ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार दिवाळीआधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 5 / 10 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल आर्थिक विषयांसंदर्भातल्या कॅबिनेटच्या समितीची बैठक झाली. यात काही निवडक कर्जांवरील व्याज माफ करण्याच्या निर्णयावर सहमती झाल्याचं वृत्त सीएनबीसी आवाज या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 6 / 10 सध्या लोन मॉरटोरियमचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता याबद्दलची घोषणा करणार नसल्याचं सुत्रांनी सांगितलं. 7 / 10 लोन मॉरटोरियममुळे तुम्ही काही कालावधीसाठी तुमचा ईएमआय थांबवू शकता. कोरोना काळात कर्जदार आर्थिक संकटात सापडल्यानं रिझर्व्ह बँकेनं लोन मॉरटोरियमचा पर्याय दिला होता. 8 / 10 मार्च ते ऑगस्ट अशा सहा महिन्यांसाठी लोन मॉरटोरियम योजना आणली गेली. मात्र बँका थकबाकीवर अतिरिक्त व्याज म्हणजे व्याजावर व्याज आकारत असल्याची तक्रार अनेकांनी केली. त्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. 9 / 10 आर्थिक विषयांसंदर्भातल्या कॅबिनेटच्या समितीच्या बैठकीत व्याज माफीला मंजुरी मिळाली आहे. मात्र ही माफी काही निवडक प्रकारच्या कर्जांसाठी असेल. 10 / 10 समितीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावात निवडक कर्जांवरील व्याज माफ करण्याची तरतूद आहे. सरकार व्याजावर एक्स ग्रेशिया पेमेंट करेल. याचा लाभ २ कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या व्यक्तींना मिळेल. आणखी वाचा