शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३७० जागांचं 'मिशन'; पंतप्रधान मोदींसह भाजपाला पार करावे लागतील ५ अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 3:58 PM

1 / 7
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपाकडून ‘अबकी बार ४०० पार’ अशी घोषणा दिली जात होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी लोकसभेत संबोधित करताना पक्षासमोर ३७० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भाजपासाठी ३७० जागांच्या आसपास जाणंही फार कठीण आहे. हे लक्ष्य गाठायचं असल्यास भाजपाला ५ प्रमुख अडथळे पार करावे लागणार आहेत.
2 / 7
२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह केंद्रात सरकार स्थापन केलं होतं. २०१९ मध्ये तर भाजपाने ३७ टक्के मतांसह ३०३ जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या ५ वर्षांत परिस्थिती खूप बदलली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्या सोबतच भाजपाचा प्रभाव असलेल्या उत्तर भारतामध्येही निवडणूक लढवणं भाजापाला कठीण जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपासमोर असलेले ५ प्रमुख अडथळे पुढीलप्रमाणे आहेत.
3 / 7
भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये घवघवीत यश मिळवलं होतं. दिल्लीत तर भाजपाने पैकीच्या पैकी जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी परिस्थिती फार बदललेली आहे. इंडिया आघाडी आकारास आल्याने दिल्ली, पंजाबसारख्या राज्यात आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटप झाल्यास भाजपाचं गणित बिघडू शकतं. तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्याने तिथलीही समिकरणं बदली आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख मिळून भाजपाने मागच्या वेळी ३ जागा जिंकल्या होत्या. या जागा राखणं भाजपासाठी अवघड आहे. तर हरियाणामध्येही २०१९ च्या यशाची पुनरावृत्ती करताना भाजपाचा कसोटी लागणार आहे.
4 / 7
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा या महाआघाडीचं आव्हान मोडून काढत ६२ जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर २०१४ मध्ये भाजपाने येथे तब्बल ७१ जागा जिंकल्या होत्या. आता लोकसभा निवडणुकीत ३७० जादांचं लक्ष्य गाठायचं असल्यास भाजपाला उत्तर प्रदेशामध्ये किमान ७० ते ७५ जागा जिंकाव्या लागणार आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये तयार होत असलेली राजकीय समिकरणं पाहता भाजपासाठी हे लक्ष्य गाठणं आव्हानात्मक आहे.
5 / 7
लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपासमोर तिसरा अडथळा पूर्व भारतातून येण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये पूर्व भारतातील बिहार, पश्चिम बंगाल, ओदिशा आदि राज्यांमध्ये भाजपाने समाधानकारक कामगिरी केली होती. भाजपाने बिहारमध्ये १७, बंगालमध्ये १८ आणि ओदिशात ८ जागा जिंकल्या होत्या. मात्र पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यातील भाजपाचा वाढता प्रभाव कमी करण्यात यश मिळवलं आहे. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना सोबत घेतल्यानंतरही भाजपाची स्थिती फारशी समाधानकारक नाही आहे. ओदिशामध्ये भाजपाच्या प्रचार यंत्रणेत तितकासा जोर नाही आहे. त्यामुळे मोदींनी समोर ठेवलेल्या लक्ष्याच्या जवळ जायचं असल्यास भाजपाला या भागात मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा कायम राखाव्या लागणार आहेत.
6 / 7
दक्षिण भारतात भाजपाकडे नेहमी उत्तर भारतीयांचा पक्ष म्हणून पाहिलं गेलंय. २०१९ मध्ये लोकसभेच्या ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेची एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली होती. आता ३७० जागांचा टप्पा गाठायचा असेल तर, कर्नाटक आणि तेलंगाणा या दोन्ही राज्यांमध्ये चांगली कामगिरी करतानाच तामिळनाडूसह केरळ आणि आंध्र प्रदेशमधून जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत. ही बाब सध्यातरी अवघड दिसत आहे.
7 / 7
२०१४ नंतर महाराष्ट्रामध्ये भाजपाचा प्रभाव सातत्याने वाढत गेला आहे. मात्र २०१९ मध्ये झालेली राजकीय उलथापालथ, आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रात भाजपाची वाढ खुंटली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी उभी राहिली होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडत भाजपाने ही आघाडी कमकुवत केली आहे. तरीही भाजपाला महाराष्ट्रात यश मिळवण्याबाबच साशंकता आहे. २०१९ मध्ये भाजपाने महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. तर युतीमध्ये मिळून ४१ जागांवर कब्जा केला होता. आता ३७० जागांचा टप्पा पार करायचा असल्यास भाजपाला महाराष्ट्रातून यापेक्षा अधिक मोठं यश मिळवावं लागणार आहे. मात्र सध्यातरी ते कठीण दिसत आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक