शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 3:46 PM

1 / 7
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. तसेच देशभरातून मिळत असलेल्या संकेतानुसार सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीने पुढील वाटचालीसाठी रणनीती आखण्यासा सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १ जून रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची चर्चा समीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
2 / 7
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सातव्या टप्प्यातील मतदान आणि चक्रिवादळानंतरचं मदत कार्य यामुळे या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. मी बंगालमध्ये राहिले तरी माझं मन या बैठकीत असेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील ५७ जागांवरील मतदान होत असताना त्याच दिवशी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्याचं कारण काय आणि केवळ मतदानाचा आढावा घेण्यापुरतीच ही बैठक मर्यादित असेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ही बैठक बोलावण्यामागची महत्त्वाची कारणं पुढीलप्रमाणे आहेत.
3 / 7
मल्लिकार्जुन खर्गे यांनी १ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक होण्यामागे केजरीवाल फॅक्टर महत्त्वाचा असल्याचं सांगितले जात आहे. एकीकडे आप आणि काँग्रेस काही राज्यात एकत्रपणे लढले असले तरी पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यात अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर असून, १ जून रोजी त्यांच्या जामीनाची मुदत संपत आहे. त्यामुळे १ जून रोजी बैठक बोलावण्यामध्ये केजरीवाल हे मुख्य कारण असू शकतं.
4 / 7
इंडिया आघाडीच्या जेव्हा बैठका होत होत्या, तसेच आघाडीचं नामकरण होत नव्हतं. तेव्हा या आघाडीत मोठ्या प्रमाणात विरोधाभास असल्याचा दावा करण्यात येत होता. तसेच हे पक्ष एकत्र येणं कठीण आहे, असे दावे केले जात होते. तसेच लोकसभेची निवडणूक जवळ आल्यावर तसंच घडलं. केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढले. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीपासून वेगळी वाट केली. आम आदमी पक्ष पंजाबमध्ये काँग्रेसविरोधात लढत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काहीशा विस्कळीत झालेल्या इंडिया आघाडीला एकत्र आणून १ जूनला होणाऱ्या बैठकीमधून त्यांच्यातील दुरावा दूर करणं आणि मतमोजणीपूर्वी इंडिया आघाडीत ऐक्य घडवणं, हा या बैठकीमागचा एक उद्देश आहे.
5 / 7
काँग्रेस पक्ष हा निर्णय घेण्यात खूप वेळ घालवतो, अशी टीका होत असते. नितीश कुमार यांनी जेडीयू इंडिया आघाडीत असताना पाच राज्यांमधील निवडणूक सुरू असताना कुठलीही बैठक न बोलावल्यामुळे काँग्रेसवर टीका केली होती. तसेच जागावाटपामध्येही काँग्रेसने दाखवलेल्या वेळखावूपणामुळेही काँग्रेसवर टीका झाली होता. लोकसभा निवडणुकीवेळीही अनेक राज्यांत हेच चित्र दिसलं होतं. मात्र आता मतमोजणीपूर्वी आक्रमकपणे चाली खेळून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काँग्रेसचा विचार आहे.
6 / 7
४ जून रोजी लागणाऱ्या निकालांनंतर सरकार बनवण्यासाठी काही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर लागणाऱ्या अतिरिक्त सहकाऱ्यांची जुळवाजुळव करण्याची तयारी १ जून रोजी होणाऱ्या बैठकीमधून केली जाण्याची शक्यता आहे. भाजपा आणि एनडीएला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यास इंडिया आघाडीकडे सरकार स्थापन करण्याची संधी असेल, अशा वेळी इंडिया आघाडीकडे वळू शकतील, अशा पक्षांची ओळख या बैठकीतून निश्चित केली जाऊ शकते.
7 / 7
जेव्हा इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली तेव्हा नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या ऐक्यासाठी देशपातळीवर प्रयत्न केले. त्यावेळी नितीश कुमार हे या आघाडीचा प्रमुख चेहरा होते. मात्र नंतर बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत काँग्रेसने प्रमुख पक्ष म्हणून भूमिका बजावली. तसेच पुढील बैठकांमध्ये काँग्रेस प्रमुख पक्षाच्या भूमिकेत राहिलाय. आता सरकार स्थापन करण्याची संधी चालून आल्यास त्याचं नेतृत्व काँग्रेसकडे राहावं, यासाठी मलिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी पत्र पाठवून काँग्रेसच ड्रायव्हिंग सिटवर असल्याचा संदेश दिला आहे.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे