शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशात सरकार बनवण्याच्या दृष्टीनं पाऊल; 'INDIA' आघाडीची शरद पवारांवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 4:06 PM

1 / 10
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच इंडिया आघाडी नियोजित प्लॅनिंगची तयारी करत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवलं गेलं आहे.
2 / 10
विरोधी इंडिया आघाडीपासून वेगळे होत स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढणाऱ्या टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीपासून दूर राहणं पसंत केले आहे. मात्र त्यांनी त्यांच्या पक्षाकडून एका प्रतिनिधीला बैठकीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांपासून अखिलेश यादव, तेजस्वी यादव, मेहबूबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, कल्पना सोरेन आणि आपचे अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
3 / 10
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी ठाकरे गटाकडून बैठकीला एक प्रतिनिधी हजर राहणार आहे. त्याशिवाय इंडिया आघाडीतील इतर नेतेही बैठकीला उपस्थित राहतील. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाळ यांच्यासह पक्षातील काही नेते हजर राहतील
4 / 10
निवडणूक निकालाच्या नंतरच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होईल. ही बैठक केवळ एकमेकांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी नव्हे तर नवीन मित्रांना आघाडीत घेण्याच्या रोडमॅपवर चर्चा होईल. इंडिया आघाडीला पंतप्रधानपदावर सहमती बनवण्याआधी नवीन मित्रांना सोबत घेण्याची गरज आहे. कारण सरकार बनवण्याच्या स्थितीत नंबर गेममध्ये ते मागे राहू नये.
5 / 10
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे राजकीय वातावरण आहे त्यातून इंडिया आघाडीचा विश्वास वाढला आहे. भाजपाच्या नेतृत्वातील सरकार यंदा बहुमतापासून दूर राहील आणि इंडिया आघाडीचं सरकार बनेल असं विरोधी पक्षातील नेत्यांना वाटत आहे.
6 / 10
नरेंद्र मोदी ४ जूननंतर देशाचे पंतप्रधान नसतील अशी विधाने विरोधकांनी केली आहेत. या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त लोकांचा प्रतिसाद इंडिया आघाडीला मिळाला असून २००४ प्रमाणे या निकालानंतरही सरकार बनवण्याची परिस्थिती बनू शकते असा दावा विरोधक करत आहेत.
7 / 10
इंडिया आघाडी अशा नव्या मित्रपक्षांच्या शोधात आहे जे कुठल्याही आघाडीचा भाग नाहीत. त्याशिवाय एनडीएतील काही मित्रपक्षांनाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असू शकतो. केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बनण्याची स्थिती आली तर NDA तील काही पक्ष भाजपापासून वेगळे होऊ शकतात असा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
8 / 10
नितीश कुमार हे पलटी मारण्यात माहीर आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी २०१९ मध्ये काँग्रेससोबत आघाडी केली होती असे काही संकेत जयराम रमेश यांनी दिलेत. इतकेच नाही तर नितीश यांच्याबाबत तेजस्वी यादव यांनीही ४ जूननंतर नितीश कुमार लोकशाही आणि पक्ष वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकतात असा दावा केला आहे.
9 / 10
२०२४ च्या निवडणुकीत बंगालमध्ये टीएमसी, तेलंगणात माजी मुख्यमंत्री केसीआर यांचा BRS, ओडिशा येथे नवीन पटनायक यांचा बीजेडी, आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डींचा वायएसआर काँग्रेस, असदुद्दीन औवेसी यांचा AIMIM, पंजाबमध्ये सुखबीर सिंह बादल यांचा अकाली दल, हरियाणात जेजेपी हे पक्ष सध्या कुठल्याही आघाडीचा भाग नाहीत. त्याव्यतिरिक्त तामिळनाडूत एआयडिएमके आणि उत्तर प्रदेशात बसपा स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत.
10 / 10
ममता बॅनर्जींना सोबत आणण्याची जबाबदारी अखिलेश यादवांना, केसीआरला आणण्याची जबाबदारी केजरीवाल आणि अखिलेश यादव यांच्यावर, तर शरद पवार यांना वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांना इंडिया आघाडीत आणण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.त्यामुळे इंडिया आघाडीनं नव्या मित्रांना सोबत घेण्याचं प्लॅनिंग केलं आहे.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस