शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 1:19 PM

1 / 10
आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत भाजपा प्रणित NDA आणि काँग्रेस प्रणित INDIA आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. २०१४, २०१९ नंतर पुन्हा एकदा भाजपा अबकी बार ४०० पार नारा देत निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
2 / 10
मात्र या निवडणुकीत काँग्रेसवर खूप वाईट वेळ आली आहे. देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या आणि सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस पक्ष येत्या २०२४ च्या निवडणुकीत इतिहासातच पहिल्यांदाच कमी जागा लढवत आहे. २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेत काँग्रेसनं ४४ जागा जिंकल्या होत्या. ज्या आतापर्यंतच्या काँग्रेसच्या कमी जागा होत्या.
3 / 10
आता काँग्रेस देशभरात ३५० जागा लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं आतापर्यंत २६६ जागांवर उमेदवार जाहीर केलेत. सूत्रांनुसार, काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत ३३० ते ३४० उमेदवार मैदानात उतरवू शकते. जर असं घडलं तर पहिल्यांदाच निवडणूक इतिहासात काँग्रेस ४०० पेक्षा कमी लोकसभेच्या जागा लढवेल.
4 / 10
१९५१-५२ ते २०१९ पर्यंत देशभरात झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं कधीही ४०० पेक्षा कमी जागा लढवल्या नाहीत. २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसनं लोकसभेच्या ४१७ जागा लढवल्या होत्या. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत ४४० जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे होते.
5 / 10
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ४६३ जागांवर उमेदवार उतरवले तर २०१९ च्या निवडणुकीत ४२१ जागा काँग्रेसनं लढवल्या होत्या. मागील १७ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक उमेदवार १९९६ च्या लोकसभेत उतरवले होते. त्यांची संख्या ५२९ इतकी होती.
6 / 10
यंदा काँग्रेस ४०० हून कमी जागा लढवणार यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे INDIA आघाडी. मोदींविरोधात इंडिया आघाडी बनवण्यात आली असून त्यात विविध २८ पक्षांचा समावेश आहे. त्यात जागावाटपात मित्रपक्षांना न दुखावता काँग्रेस तडजोडीचं राजकारण करत आहे.
7 / 10
उत्तर प्रदेशात युपीएच्या काळात काँग्रेसनं ६७ जागा लढवल्या होत्या. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अवघ्या १७ जागांवर निवडणूक लढवत आहे. पश्चिम बंगालमध्येही तीच स्थिती आहे. याठिकाणी मागील निवडणुकीत काँग्रेसनं ४१ जागा लढवल्या तर यंदाच्या निवडणुकीत केवळ २० उमेदवार उभे केले आहेत.
8 / 10
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत काँग्रेसनं मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ४ जागा, गुजरातमध्ये २ जागा, राजस्थानात ३ जागा कमी लढवत आहे. तर मध्य प्रदेशात १ जागा कमी झाली असून महाराष्ट्रातही काँग्रेसला एकूण ४८ पैकी १६ जागा वाट्याला आल्यात.
9 / 10
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं आजपर्यंत इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवली नाही. जितक्या यंदाच्या निवडणुकीत लढवणार आहे. मागील ३५ वर्षाचा रेकॉर्ड पाहिला तर ३ लोकसभा निवडणूक वगळता काँग्रेस सातत्याने कमी जागांवर उमेदवार उभे करत आहे.
10 / 10
२०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभेत काँग्रेसनं ५२ जागा जिंकल्या. सध्या काँग्रेस देशातील ३ राज्यांमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं दिसून येते.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी